सुधीरभाऊंचा कॉन्फिडन्स आणि बजेटकडून अपेक्षा

0

मुश्किले जरुर है, मगर ठहरा नही हू मै !
मंजिल से जरा कह दो, अभी पहूंचा नही हूँ मै !
कदमो को बांध न पाएगी मुसिबत की जंजिरे,
रास्तों से कह दो अभी भटका नही हूँ मै !

असा शेर म्हणत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केलेली अजूनही चांगलेच आठवतेय. मात्र या एका वर्षात नेमके राज्याला काय मिळाले? या प्रश्नाचे उत्तर राज्यातील जनतेसमोर आहेच. खरे चित्र जाणून असणाऱ्या जनतेला सरकारकडून जाहिरातबाजीच्या माध्यमातून विकासाच्या कथित डोंगराचे चित्र वारंवार दर्शविले जातेच, हा भाग वेगळा. शुक्रवारी पुन्हा एकदा सुधीरभाऊ अर्थसंकल्प मांडतील. हा अर्थसंकल्प मांडण्याच्या आधी सुधीरभाऊंचा प्रचंड आत्मविश्वास राज्याला कुठच्या कुठं घेऊन जातो की काय? असाच वाटत होता.

आर्थिक पाहणी अहवाल सभागृहात मांडताना महाराष्ट्र राज्य विकासाची नवी क्षेत्रे पादाक्रांत करत असून आपला विकास दर वाढला आहे. विरोधकांनी एकत्रित येऊन हातभार लावला तर महाराष्ट्र 193 देशात पुढे नेऊ असे सांगत सुधीरभाऊंनी पंतप्रधानांचे ते खरेखुरे पाईक आहेत हे दाखवून दिलेच. सुधीरभाऊंचा हजरजबाबीपणा नेहमीच वाखाणण्याजोगा असतोय. भाऊंनी यावेळी विरोधकांनो, सोबत राहा तुम्हाला निवडणूक जिंकता येणार नाही पण टीकात्मक काम न करता रचनात्मक काम केले तर मने मात्र नक्की जिंकाल असा टोमणा मारला. सुधीरभाऊ बोलत असताना जयंत पाटील यांनी, ‘सुधीरभाऊ, राज्याचे जाऊ द्या चंद्रपूरचे बोला’ असा टोमणा मारताच भाऊंनी, ‘पहले बी फॉर बारामती पी फॉर पुणे होते, आता बी फॉर बल्लारपूर, पी फॉर पोंभुर्णा झाले आहे.’ असे म्हणत सिक्सर लावत पाटलांना गप्प केले.

सुधीरभाऊ म्हणजे खरोखर हजरजबाबी आणि तितकेच आक्रमक असलेले मंत्री आहेत. त्यांची काळजी सत्ताधाऱ्यांसह विरोधक देखील नेहमीच करत असलेले दिसून येतेय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीला आता ते देशाच्या नव्हे तर जगाच्या पटलावर नेण्याची भाषा करताहेत. त्यांच्या या स्टेटमेंटने मोदी साहेबांना देखील चॅलेंज केलेय. कारण मोदींनी देखील १९३ देशात देशाला पुढे नेण्याची गोष्ट त्यांच्याइतक्या आत्मविश्वासाने केलेली नाही. अर्थात मोदी साहेबांच्या आत्मविश्वासाचे माप कुठल्याच तराजूत होणारे नाहीच. असो, एकंदरीत सुधीरभाऊंचा कॉन्फिडन्स अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला जोरदार दिसून येत होता. अर्थसंकल्पात देखील सामान्य माणसांना त्यांच्याकडून अशाच जोरदार अपेक्षा आहेत. आर्थिक पाहणी अहवालात तर विकासदाराची स्थिती बोंबललेली दिसतेय. त्यामुळे अर्थसंकल्पात सामान्यांना काय दिलासा मिळतोय याकडे लक्ष लागून आहे. शासनावरील कर्जाचा मोठ्ठा डोंगर, शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराच्या बातम्यांनी सध्या सरकारवर अपेक्षांचा मोठा बोजा आहे. या अपेक्षांवर सुधीरभाऊ अर्थात आपले सरकार कितपत खरे उतरणार ते शुक्रवारी दुपारनंतर आपल्याला कळेलच. या अर्थसंकल्पात युवकांना रोजगार मिळावा, उद्योगांना चालना मिळावी, महागाई कमी व्हावी, शेतकरी ज्याला सरकार नेहमीच राजा म्हणते तो सुखी व्हावा आणि सामान्यांना किमान मूलभूत गरजांसह जगता यावे एवढी तरी व्यवस्था व्हावी, हीच अपेक्षा.

-निलेश झालटे