नवी दिल्ली : भारताने अत्याधुनिक सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची ओडिशाच्या बालासोर येथील तळावरून गुरुवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. यामुळे संरक्षण क्षेत्रात भारत लवकरच ताकदवान देश बनणार आहे. या वर्षातील ही तिसरी यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी आहे. सुपरसॉनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रामध्ये आपल्याकडे येणार्या कोणत्याही क्षेपणास्त्राला भेदण्याची क्षमता आहे. या इंटरसेप्टर मिसाइलमुळे पृथ्वीच्या हवाई कक्षेत 30 किमी उंचीच्या आतून जाणार्या कोणत्याही क्षेपणास्त्राला निशाणा बनवत देशाच्या सीमेवर होणारा संभाव्य हल्ला रोखता येऊ शकतो.
सिंगल स्टेज सॉलिड रॉकेट मिसाईल
गुरूवारी घेण्यात आलेली चाचणी ही इंटरसेप्टरच्या विविध कामांच्या तपासणीसाठी करण्यात आली होती, जी पूर्णपणे यशस्वी झाली आहे. हे क्षेपणास्त्र 7.5 मीटर लांबीचे सिंगल स्टेज सॉलिड रॉकेट मिसाईल आहे. जे रिमोटद्वारे नियंत्रित करण्यात आले होते. परिक्षणानंतर संरक्षण क्षेत्रातील सुत्रांनी सांगितले की, आपल्या लक्ष्याला थेट भेदण्यात हे क्षेपणास्त्र यशस्वी झाले असून ही मोठी बाब आहे. यापूर्वी भारताने याच श्रेणीतील दोन क्षपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या अनुक्रमे 11 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी केल्या होत्या.