नवी दिल्ली: सध्या लोकसभा निवडणुकीची धूमधाम सुरु आहे. सर्वत्र राजकीय नेते प्रचार करतांना दिसत आहे. राजकीय नेत्यांकडून जाती-धर्माच्या आधारे मते मागितले जात आहे. मात्र जाती-धर्माच्या आधारावर मते मागणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले असतांना निवडणूक आयोगाकडून तशी कारवाई होत नसल्याने सुप्रीम कोर्टाने आज निवडणूक आयोगाला चांगलेच फटकारले. मायावतींनी धर्माच्या आधारे मतदान करण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर नोटिशीला उत्तर दिले नाही, याबाबत तुम्ही काय केलं? असा सवाल कोर्टाने विचारला. या प्रकरणी मंगळवारी होणाऱ्या सुनावणीला निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनीही हजर राहावे, असे आदेशही कोर्टाने दिले.
निवडणूक प्रचारादरम्यान धर्म आणि जातीच्या आधारे मते मागणाऱ्या नेत्यांवर आणि पक्षांवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली.