सुब्रोसच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्ष एकवटले

0

कंपनी व्यवस्थापन आक्रमक, कामगारांना काढून टाकण्याचा प्रयत्न : आंदोलनाचा इशारा

चाकण । चाकण औद्योगिक वसाहतीतील सुब्रोस कंपनीतील कामगारांना न्याय मिळावा म्हणून खेड तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले आहेत. व्यवस्थापन आक्रमक भूमिका घेऊन कामगारांना काढून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे खेड तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी कामगारांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चाकण पोलिसांना दिला आहे.

कामगारांचे आमरण उपोषण
चाकण एमआयडीसीमधील सुब्रोस कंपनीतील वाद संपुष्टात येत नसल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी कामगारांच्या लढ्याला पाठींबा दिला आहे. संबंधित कंपनीतील कामगारांनी मागील 19 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. तरीही व्यवस्थापन अनेक कामगारांना कामावर घेण्यास तयार नसल्याने जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील, खेड पंचायत समितीचे उपसभापती अमोल पवार, अनिल (बाबा) राक्षे, डॉ. शैलेश मोहिते-पाटील, विजय डोळस, सोमनाथ मुंगसे आदींसह सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी शनिवारी चाकण पोलिसांची भेट घेतली. संबंधित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी पोलिस अधिकार्‍यांकडे केली.

कामगारांनी वाचला अन्यायाचा पाढा
पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी संबंधित कंपनीच्या मालकांशी कामगार, त्यांची संघटना आणि स्थानिक पदाधिकारी यांची तातडीने बैठक घेऊन हा तिढा सोडविण्यासाठी शक्य ते प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍वासन यावेळी दिले. यावेळी सुब्रोसचे कामगार मोठ्या संखेने उपस्थित होते. कंपनी व्यवस्थापन कशा प्रकारे कामगार कायदे धाब्यावर बसवून कामगारांवर अन्याय करीत आहे, याचा पाढा सर्वपक्षीय पदाधिकारी आणि पोलिसांसमोर वाचला.

पोलिसांची भूमिका संशयास्पद
जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांनी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाशी नव्हे तर मालकांशी चर्चा करावयाची असल्याने पोलिसांनी मालकांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी शरद बुट्टे यांनी केले. कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत लढा देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. शैलेश मोहिते-पाटील यांनी यावेळी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस यांनी पोलिसांशी जोरदार वाद घातला.