पेन्सिलद्वारे व्यक्तीचे हुबेहूब चित्र
पिंपरी : कलाकार हा कोणताही उद्योग किंवा नोकरी करीत असला तरी आपली कला व्यक्त करण्यासाठी त्याची धडपड सुरू असते. जिथे मिळेल तिथे कला व्यक्त करण्याचा प्रयत्न असतो. असाच एक कलाकार आहे. सुरक्षारक्षकाचे काम करणारे रावसाहेब चक्रनारायण यांनी आपला उद्योग संभाळत चित्रकलेची आवड जोपासली आहे. पेन्सीलद्वारे एखाद्या व्यक्तीचे हुबेहुब चित्र काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. जगण्याच्या संघर्षात स्वतःची आवड जोपासू न शकलेले रहाटणी-नखातेवस्ती येथील सुरक्षारक्षक रावसाहेब हे निवृत्तीनंतर चित्रकलेची आवड जपत आहेत.
सुरक्षा करतानाच चित्रकलेची आवड
मुळचे नेवासा येथील रहिवाशी असलेले रावसाहेब नोकरी-व्यवसायानिमित्त रहाटणीला आले. त्यांनी भोसरी औद्योगिक वसाहतीमध्ये खासगी कंपनीत वेल्डर, फिटरचे काम करून रोजीरोटीचा प्रश्न सोडविला. निवृत्तीनंतर पिंपरीतील एका खासगी बँकेच्या एटीएमसाठी सुरक्षारक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली. एटीएमची सुरक्षा करतानाच स्वतःची चित्रकलेची आवडदेखील ते जोपासत आहेत. त्यांची चित्रे पाहून एटीएममध्ये येणारे नागरिक त्यांच्याकडून स्वतःची चित्रे काढून घेतात. तसेच त्यांना बक्षिसेदेखील देऊ करतात. नेवासा येथील ज्ञानोदय हायस्कूलमध्ये त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झालेले आहे. चित्रकलेतील कोणत्याही प्रकारचे शिक्षण न झालेल्या या अवलिया चित्रकाराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सरावातून चित्रकलेतील कौशल्य मिळविले. गेल्या चार वर्षांपासून पेन्सिल स्केचद्वारे व्यक्तिचित्रण करण्यावर त्यांचा भर आहे.
बँकेने केला सत्कार
राजकीय पुढारी, अभिनेते, अभिनेत्री यांची वृत्तपत्रात छापून आलेली छायाचित्रे पाहून त्यावरून ते हुबेहूब चित्र काढतात. त्याशिवाय लहान मुलांपासून ते थेट ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींची चित्रे ते काढून देतात. दिवसभरात एक ते दोन चित्र काढून पूर्ण करतात. त्यांचे काम व त्यांचे चित्रकलेतील कौशल्य पाहून बँकेनेदेखील त्यांचा सत्कार केला आहे.