मुंबई । रेल्वेस्थानकावरील महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाच्या समयसूचकतेमुळे एका चिमुकलीचे प्राण थोडक्यात वाचले. महालक्ष्मी स्थानकातील ही घटना काळजाचा थरकाप उडवणारी होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सचिन पोळ या सुरक्षा बलाच्या जवानाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे तसेच त्याला सुरक्षा बलाच्या वतीने 10 हजार रुपयांचे बक्षीसदेखील घोषित केले आहे. भिवंडीला राहणारे मोहम्मद धिशान हे महालक्ष्मी स्थानकात आपली पत्नी आणि 5 वर्षीय मुलीसोबत गाडीमध्ये चढत होते.
मात्र, त्यांचा अंदाज चुकला, ते आणि त्यांची पत्नी गाडीत चढेपर्यंत गाडीने वेग धरला होता. दोघे कसेबसे गाडीत चढले. मात्र, 5 वर्षीय मुलीला काही जमत नव्हते. गाडी सुटली आणि मुलगी गाडीखाली खेचली जाणार, तितक्यात देवदूतासारखा जवान धावला आणि त्या मुलीचे प्राण थोडक्यात वाचले. मुलीला ट्रेनमध्ये चढायला जमणार नाही, हे त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान असलेल्या सचिन पोळ याने बघितले आणि क्षणाचाही विलंब न करता त्या मुलीला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढले. तोल गेल्याने मुलगी ट्रेनच्या खाली जाऊ लागली. हा प्रकार स्थानकावरील इतर प्रवासी पाहत होते. त्याचवेळी सचिन पोळ यांनी त्या दिशेने धाव घेतली आणि आईच्या हातातून मुलीचे बोट निसटणार इतक्यात त्यांनी प्रसंगावधान राखत मुलीला लोकलपासून लांब ओढले. विशेष म्हणजे केवळ 2.3 सेकंदात सचिन पोळने हे केले. हे करताना सचिन पोळ यांना थोडे खरचटले आहे. दरम्यान, महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाने दाखवलेल्या या साहसाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.