जळगाव। पार्किगमध्ये मोटारसायकल उभी करुन बाजूलाच लघुशंका केल्याच्या कारणावरून तरूणाला सुरक्षा रक्षकांसह एकाने बेदम मारहाण केली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास खान्देश सेंट्रल मॉल येथे घडली. याप्रकरणी तरूणाने दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही सुरक्षारक्षकांसह एका युवकाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय मनोहर जाधव (वय-28) हा तरूण शिवकॉलनी परिसरातील स्टेट बँकसमोर वास्तव्यास आहे. शुक्रवारी रात्री अजय हा मित्र नाशिर शेख कुतुबुद्दीन शेख हे मोटारसायकने खान्देश सेंट्रल मॉल येथे चित्रपट पाहण्यासाठी आले होते. मॉलच्या पार्किंगमध्ये अजयने मोटारसायकल पार्क केल्यानंतर बाजूलाच लघुशंका केली. हा प्रकार तेथील दोन सुरक्षा रक्षकांना लक्षात आला. त्यानंतर अजय आणि मित्र मॉलच्या आत गेल्यानंतर ग्रॉऊंड फ्लोअरला असलेले आयनॉक्स मल्टीप्लेक्स या चित्रपट गृहात जात असतांना तपासणी कॉऊंटरजवळ त्यांना दोन्ही सुरक्षा रक्षकांनी अडवून पार्किंगमध्ये मोटारसायकलच्या बाजूलाच लघुशंका केल्याचा जाब विचारला. यात वाद होवून दोघांनी अजयला मारहाण केली. तेथे उपस्थित असलेल्या आणखी एका युवकाने अजयला मारहाण केली. दरम्यान, एका सुरक्षा रक्षकाने त्याच्याजवळ असलेल्या दांड्याने अजयच्या डोक्यावर मारहाण केल्याने त्यात अजयच्या डोक्याला दुखापत होवून तो जखमी झाला. यानंतर आज शनिवारी अजय याने शहर पोलिस स्टेशन गाठत दोन्ही सुरक्षा रक्षक व एका तरूणाविरूध्द तक्रार दाखल केली. त्यावरून शहर पोलिस ठाण्यात मारहाण करणार्या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सतिष सुरळकर हे करीत आहेत.
एलआयसी एजंटाची गोलाणीतून दुचाकी लांबविली
मोबाईल दुरूस्तीसाठी कुर्हा पानाचे (ता.भुसावळ) येथून आलेल्या एलआयसी एजंटाची दुचाकी गोलाणी मार्केटमधून अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना आज उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय रामदास उंबरकर वय-39 हे भुसावळ तालुक्यातील कुर्हा पानाचे येथील रहिवासी असून एलआयसी एजंट म्हणून काम करतात. उंबरकर यांचा मोबाईल नादुरूस्त असल्यामुळे बुधवारी 19 जुलै रोजी दुपारी ते कुर्हा पानाचे येथून एमएच.19.एव्ही.2103 या दुचाकीने जळगावात आले. दुपारी 2 वाजेच्या सुमारास जळगावात आल्यानंतर त्यांनी गोलाणी मार्केट येथील व्हिवो गॅलरीच्या समोर दुचाकी उभी करून मार्केटमध्ये मोबाईल दुरूस्ती करण्यासाठी निघून गेले. तासाभरानंतर आल्यानंतर त्यांना त्यांची दुचाकी उभ्या केलेल्या दिसून न आल्याने परिसरात शोध घेतला. अखेर दुचाकी चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर आज शनिवारी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पूढील तपास सहाय्यक फौजदार बळीराम तायडे हे करीत आहेत.