पुणे : महापालिकेच्या सुरक्षा विभागातील वेगवेगळे गैरव्यवहार समोर येऊ लागल्याने आता या विभागाच्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे सुरक्षा विभागातील सर्वच गैरकारभाराचे बिंग फुटणार आहे. महापालिकेला कंत्राटी सुरक्षारक्षक पुरविणार्या ठेकेदारांच्या ठेक्यास मुदतवाढ देण्यासाठी सुरक्षा अधिकारी संतोष पवार यांनी तब्बल दहा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यात चार लाखांची लाच स्वीकारताना पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली होती. त्यातच महापालिकेच्या एका वरिष्ठ लिपिकाच्या स्टिंग ऑपरेशनची क्लिप व्हायरल झाली, त्यातही सुरक्षा विभागातील अधिकार्यांकडून कसा भ्रष्टाचार होतो याचे बिंग फुटले होते. त्यामुळे या सर्व प्रकाराची आता पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून त्यासंबधीची खातेनिहाय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी यासंबधीची माहिती दिली, त्या म्हणाल्या, सुरक्षा विभागातील काही ठेकेदारांना पुन्हा पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे मुदत संपल्यानंतर नव्याने निविदा प्रकिया का राबविली गेली नाही, तसेच संबधित ठेकेदारांची बिलेही अदा करण्यात आली नव्हती. त्यामुळे ती का रखडून ठेवण्यात आली होती असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे यासर्व प्रकारांची आणि संबधितांची खातेनिहाय चौकशी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सुरक्षा विभागात कंत्राटी रक्षकांच्या नेमणुकीत गैरकारभार चव्हाट्यावर येणार असून या प्रकारांना लगाम लागण्याची शक्यता आहे.
तिकडे सुटले तरी…
महापालिकेचे निलंबित सुरक्षा अधिकारी पवार यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. मात्र या विभागाच्या चौकशीच्या फेर्यातून ते सुटले तरी खातेनिहाय चौकशीतून त्यांची सुटका होणार नाही असे देशभ्रतार यांनी स्पष्ट केले.