सुरक्षिततेसाठी पुतळ्यांवर काचेचे आवरण घालावे

0

मातंग विकास संस्थेची महापालिकेकडे मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात युगपुरुषांचे पुतळे बसविण्यात आले आहेत. परंतु, त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. पुतळा परिसरात स्वच्छता ठेवली जात नाही. महापुरुषांच्या पुतळ्यांची काही समाजकंटकांकडून विटंबना केली जाते. त्यामुळे सुरक्षिततेसाठी युगपुरुषांच्या पुतळ्यावर काचेचे (फायबर) आवरण घालण्याची मागणी मातंग विकास संस्थेने महापालिकेकडे केली आहे. याबाबत महापौर नितीन काळजे यांना निवेदन दिले आहे.

पुतळ्याची विटंबना होते
महापौरांना दिलेल्या निवेदनात संस्थेचे अध्यक्ष राजेश रासगे यांनी म्हटले आहे की, महापुरुषांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा नागरिकांना मिळावी या उद्देशाने शहरातील मुख्य चौकांत त्यांचे पुतळे बसविले आहेत. मोठमोठे पुतळे अनावरणाचे कार्यक्रम घेतले जातात. परंतु, पुतळ्याची, देखभाल केली जात नाही. निगा राखली जात नाही. पुतळा परिसराची स्वच्छता राखली जात नाही. त्यामुळे दंगली पेटतात. त्यातून देशाच्या संपत्तीचे नुकसान होते. देशाचे पंतप्रधान एक पाऊल स्वच्छतेकडे हा कार्यक्रम देशपातळीवर राबवत आहे. तोच विचार घेऊन महापालिकेने या युगपुरुषांच्या पुतळ्याची देखभाल, स्वच्छता, सुरक्षितता यासाठी शहरातील सर्वंच पुतळ्यांवर काचेचे आवरण घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.