सुरक्षित वातावरणात गुणवत्तापुर्ण अयुधांची निर्मिती हेच उद्दीष्ट

0

देहूरोड (प्रतिनिधी) – सध्या आयुध निर्मिती करताना स्वतःच्या सुरक्षेसोबतच परिसराच्या सुरक्षेचीही जबाबदारी प्रचंड वाढली आहे. दररोज नवी आव्हाने समोर येत आहेत. अशा परिस्थितीतही गुणवत्तापूर्ण उत्पादनाला प्राथमिकता देऊन सुरक्षेवर भर देण्याचे प्रयत्न कसोशीने केले जात आहेत, असे प्रतिपादन देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीचे महाप्रबंधक संतोषकुमार सिन्हा यांनी येथे केले.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्मचारी, सुरक्षाकर्मी आणि कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या पत्नी व कारखाना महिला कल्याण समितीच्या प्रमुख अमजु सिन्हा, कारखान्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शस्त्रास्त्र निर्मितीवर भर देण्याची गरज
शस्त्रास्त्र निर्मिती संगठनाचा आपण भाग होऊ शकलो ही आपल्यासाठी नेहमीच अभिमानाची बाब असली पाहिजे, असे सिन्हा म्हणाले. यावेळी शस्त्रास्त्र निर्मितीमधील नवीन तंत्रज्ञानासह नव्याने विकसीत होणार्‍या आयुधांबाबत त्यांनी माहिती दिली. केवळ पारंपारिक आयुधे निर्माण न करता बदलत्या काळानुसार या क्षेत्रातही महत्वपूर्ण बदल आणि अधुनिक शस्त्रास्त्र निर्मितीवर भर देण्याची गरज असून त्यादृष्टीने महत्वपूर्ण पाऊल टाकण्यास सुरुवात झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

उत्पादनांचा विकास प्रगतीपथावर
26 एम. एम. इन्फ्रारेड फ्लेअरच्या विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर एचईएमआरएलच्या माध्यमातून विकसीत करण्यात येत असलेल्या अटल या 81 एमएम स्मोक ग्रेनेडचे तंत्रज्ञान टीओटीच्या माध्यमातून हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याचे सिन्हा यांनी यावेळी सांगितले. याबरोबरच शेल 155 एमएम रेड फॉस्फरस, शेल 155 एमएम स्क्रिनींग स्मोक किंवा एकजाक्लोरोथेन बेस शेल, 81 एमएम, 26 एमएम आयआर फ्लेअर आदी उत्पादनांचा विकास प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. रोज नवी आव्हाने समोर आली तरी आम्ही दृढनिश्‍चयाने व सकारात्मकतेने आपले काम सुरू ठेवू, असे आवाहन सिन्हा यांनी कामगारांना केले.