सुरक्षेचा उपाय म्हणून मंत्रालयात बसविली जाळी

0

घटनेनंतर मंत्रालयातील पोलिस बंदोबस्तात देखील वाढ; अधिक आस्थेने केली जातेय विचारपूस
मुंबई : मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटनेनंतर सरकार खडबडून जागे झाले असून धोकादायक असलेल्या मंत्रालयाच्या नव्या इमारतीच्या मुख्य सभागृहाला जाळी बसविण्यात आली आहे. मंत्रालयात आत्महत्यांच्या घटनांमुळे सरकारची प्रतिमा डागाळत असल्याने त्यावर कसे नियंत्रण आणता येईल, यावर हर्षल रावते प्रकरणानंतर मंत्रालय प्रशासन अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. त्यानुसार अखेर मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर जाळी बसवण्यात आली आहे. गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची बैठकीत जाळी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार सोमवारी ही जाळी बसविण्यात आली. कोणी उडी मारलीच तरी ती व्यक्ती या नेटवर अलगद पडून त्याचा जीव वाचेल, अशी या मागची कल्पना आहे.

सुरक्षेबाबत सूक्ष्म खातिरदारी
मंत्रालयात गेल्या १५ दिवसांत आत्महत्येच्या प्रयत्नाच्या घडलेल्या तीन घटनांमुळे प्रचंड खळबळ माजली असून, राज्य सरकारचे मुख्यालय असणाऱ्या ठिकाणीच अशा घटना घडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर मंत्रालयातील पोलिस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली होती. मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावरील रेलिंगजवळ कोणी गेल्यास किंवा रेलिंगजवळच्या प्लॅटफॉर्मवर बसल्यास त्याला तातडीने बाजूला करण्यात येत होते. कोणत्या कामासाठी तसेच कोणाला भेटायला जात आहात, याची विचारणा करण्यात येत होती.

-पोलिसांचा विशेष बंदोबस्त
मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात संरक्षक जाळी बसवण्यात आली मात्र संरक्षक जाळी बसविल्याने सर्व प्रश्‍न सुटणार नसल्याचेही मत व्यक्‍त करण्यात येत आहे. मंत्रालयातील आत्महत्या सत्रानंतर मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसंच नवीन इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर चारही दिशेला पोलिस तैनात आहेत. भविष्यात उडी मारण्याचा प्रयत्न करू नये यासाठी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील मधल्या चौकात ही जाळी बसविण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

मंत्रालयात सर्कस करू नका – राधाकृष्ण विखे पाटील
मंत्रालयातील वाढते आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी पहिल्या मजल्यावर संरक्षक जाळ्या बसवून फारसा उपयोग होणार नाही. उलट जाळीवर उडी मारल्यास जीव जाणार नाही, फार तर हात-पाय तुटतील; पण आपल्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले जाईल, अशी भावना निर्माण झाल्यास अन्यायग्रस्त रोज मंत्रालयात उड्या मारू लागतील. त्यामुळे ही सर्कस करण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडविण्याचे सरकारने प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.