सुरत-नागपूर महामार्गावर बर्निंग ट्रेलर

0

साखर घेऊन जाणारा ट्रेलर जळून खाक, जीवितहानी टळली
नवापूर :
सुरत-नागपूर महामार्गावर मोरकरंजा शिवारात सावरट गावाजवळ सोलापूरकडून पंजाबकडे जाणार्‍या ट्रेलर (क्र.डीजे 12 वीटी 1188) ला दुपारी साडे बारा वाजता आग लागली. आगीत ट्रेलरचा जास्त भाग जळून खाक झाला आहे. सुदैवाने मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रेलर हा साखर घेऊन जात होता. कॅबीन व पुढील दोन्ही चाके जळून खाक झाली आहेत. महामार्गावर काही दिवसांपूर्वी टँन्करला आग लागून साखर आगीत जळून खाक झाली होती. त्यानंतर ही आता दुसरी घटना घडली आहे.

आग लागल्याचे लक्षात येताच चालक कमलाकांत तिवारी (रा. गाजीपूर, उत्तर प्रदेश) याने प्रसंगावधान ओळखून ट्रेलर रस्त्याच्या बाजूला उभा करुन कॅबिनमधून बाहेर उडी घेतली. त्यानंतर काही वेळातच महामार्ग पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी शेतातून व इतर घरातून पाणी आणून ट्रेलरवर टाकत आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. नवापूर नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी आला, तेव्हा आगीवर नियंत्रण मिळवले होते. महामार्गावर अचानक लागलेल्या आगीत समोरील भाग पेटल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. काही वेळ वाहतूक बंद करण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलीस चौकीवरील पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग विझवल्यावर पुन्हा या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. आग उन्हामुळे की शाँटशर्कीटने लागली, त्याचा अंदाज करण्यात येत आहे.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रहीस काझी, जब्बार शेख, पोलीस चंद्रकांत शिंदे, हे.काँ. गोरख चव्हाण, भूषण बागुल, धनंजय पवार, शहानवाज खाटीक, दीपक चौधरी, महेश महाले, मन्साराम पाटील या राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलिसांनी वेळीच मदत केल्याने पुढील अनर्थ टळल्याचे चित्र होते.