सुरत पॅसेंजर तीन तास आधी धावणार

0

प्रवाशांमधून संताप ; रात्री 12.35 ऐवजी 9.35 वाजता गाडी सोडण्याचा पश्‍चिम रेल्वेचा निर्णय

भुसावळ:- चाकरमान्यांची रेल्वे म्हणून ओळख असलेल्या भुसावळ-सुरत पॅसेंजरची वेळ बदलण्याचा घाट पश्‍चिम रेल्वेने घातला असून या प्रकाराने व्यापारी वर्गासह प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दररोज रात्री 12.35 वाजता धावणारी सुरत पॅसेंजर आता जून महिन्याच्या 10 तारखेपासून 9.35 वाजता सोडण्याचा निर्णय पश्‍चिम रेल्वे विभागाने घेतला आहे. तीन तास आधी ही गाडी सुरत येथे पोहचणार असली तरी या प्रकाराने मात्र प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

व्यापार्‍यांना सर्वाधिक फटका
कपड्याची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या सुरत शहरात खान्देशातील शेकडो व्यापारी दिवसभराचे काम आटोपून रात्रीच्या सुरत पॅसेंजरने प्रवास करतात. साधारण सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही गाडी सुरत येथे पोहचल्याने व्यापार्‍यांना या वेळेत मार्केट उघडे होत असल्याने सोयीचे होते. दिवसभरातील कामे आटोपून सायंकाळच्या व रात्रीच्या पॅसेंजरने व्यापारी खान्देशात पुन्हा परततात. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला प्रघात पश्‍चिम रेल्वेने मोडण्याचा घाट घातल्याने रेल्वे प्रवाशांसह व्यापारीवर्गाची मोठी गैरसोय होणार आहे.

नवीन वेळ गैरसोयीची
भुसावळात दररोज रात्री 12.35 वाजता सुटणारी 59078 भुसावळ-सुरत पॅसेंजरने खान्देशातील हजारो प्रवासी सुरत प्रवास करतात. दिवसभरातील कामे आटोपून रात्री प्रवास करणे प्रवाशांसह व्यापार्‍यांनादेखील सोयीचे आहे, मात्र असे असताना 9.35 वाजता ही रेल्वे सोडण्यात आल्यास दुसर्‍या दिवशी सकाळी सात वाजताच ती सुरतमध्ये पोहोचेल त्यामुळे व्यापार्‍यांना सर्वात मोठा फटका बसणार आहे. खान्देशातील नरडाणा, धरणगाव, पाळधी, अमळनेरहून दररोज शेकडो लोक रोजगारानिमित्त रात्रीपाळी संपल्यानंतर पॅसेंजरने आपापल्या गावी जातात मात्र गाडीची वेळ बदलल्यास त्यांच्यासाठी ही बाब अत्यंत गैरसोयीची ठरणार आहे. ही पॅसेंजर गेल्यानंतर प्रवाशांना रात्री अडीच वाजता गाडी असून दुसर्‍या दिवशी एक्स्प्रेसवर अवलंबून रहावे लागेल त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भूर्दंडदेखील सोसावा लागणार आहे. लोकप्रतिनिधींनी दखल घेणे गरजेचे आहे.

चर्चेतून काढणार मार्ग -रक्षा खडसे
सुरत पॅसेंजरच्या वेळेत बदल होत असल्याबाबत आपणास आत्ताच माहिती कळाली. या संदर्भात पश्‍चिम रेल्वेच्या डीआरएमसह एजीएम यांच्याशी बोलून सर्वात आधी हा निर्णय कशामुळे घेण्यात आला याबाबत माहिती घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. खान्देशातील प्रवाशांची गैरसोय होणार नाही याबाबत चर्चा करू, असे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.