सुरत पॅसेंजर रद्दच्या निर्णयानंतर प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी

भुसावळ : सुरत-भुसावळ पॅसेंजर सुरू असल्याचे नोटीफिकेशन वेस्टर्न रेल्वेने काढल्यानंतर प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत असतानाच अचानक आता पुढील आदेशापावेतो ही गाडी स्थगित केल्याचे पत्र भुसावळ विभागाला प्राप्त झाल्याने रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आता गाडी सुरू होण्याचे आदेश कधी येतात याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

अडीच वर्षांनी मिळणार होता दिलासा
कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून मार्च 2020 पासून रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या त्यानंतर रेल्वेकडून विशेष आरक्षित गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या मात्र पॅसेंजर गाड्या बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. भुसावळ येथून गेल्या काही महिन्यापूर्वी पॅसेंजर गाड्यांऐवजी मेमू गाड्या सुरू झाल्या मात्र त्यात मात्र सुरत-भुसावळ पॅसेंजर बंदच होती. मात्र आता रेल्वेने सुरत-भुसावळ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, बुधवारपासून ही गाडी सुरू होणार होती. सूरत येथून ही गाडी रात्री 11.10 वाजता सुटणार होती, व दुसर्‍या दिवशी सकाळी 7.55 वाजता भुसावळला येणार होती तर भुसावळ येथून ही गाडी 9 जूनला सायंकाळी 7.30 वाजता सुटून सुरतला दुसर्‍या दिवशी पहाटे 5.15 वाजता पोहोचणार होती व हा नित्यक्रम राहणार होता मात्र अचानक गाडी रद्द करण्याचा निर्णय वेस्टर्न रेल्वेने घेतला आहे. याबाबतचे ट्टिवटी सुरत डीआरएम यांनी केले आहे.