जळगाव । सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (सुराक्षनिका) अंतर्गत जळगाव ग्रामीण कंत्राटी कर्मचार्यांना सन 2014 ते 2018 पर्यंतची मानधनवाढ व लॉयल्टी बोनस मिळावी, या मागणीसाठी जि.प. सदस्या प्रा.डॉ. निलम पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर उपोषण पुकारण्यात आले आहे. ‘सुराक्षनिका’ कंत्राटी कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून वारंवार आपल्या मागण्या लावून धरत आहे. त्याचप्रमाणे जि.प. सदस्या प्रा.डॉ. निलम पाटील यांनीही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसेच नुकत्याच जि.प.च्या सर्वसाधारण सभेत या कर्मचार्यांचा प्रश्न उपस्थित करुन उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. तरी देखील प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. राज्यातील इतर जिल्हा परिषदांमध्ये सुराक्षनिका कर्मचार्यांना हे सर्व लाभ मिळत आहेत. मात्र जळगाव जिल्हा परिषदेतच या सुविधा दिल्या जात नसल्याने हे कर्मचारी जि.प. सदस्या प्रा. डॉ. निलम पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास बसले आहेत.
आदेशानंतरही पालन नाही
यासंदर्भात कुष्ठरोग व क्षयरोग सहसंचालकांनी जिल्हा क्षयरोग अधिकार्यांना पत्र दिले असून यानुसार 2014-15 या आर्थिक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कंत्राटी कर्मचार्यांना देण्यात येणार्या वेतनवाढ व वेतनातील फरकाची तपासणी जिल्हा लेखा व्यवस्थापकांकडून करुन घ्यावी व प्रलंबित वेतनवाढी या जिल्हा सोसायटी व जिल्हा कार्यकारी समितीच्या मान्यतेने अदा करण्याचे आदेश दिले आहे. तरी देखील त्यांच्या आदेशांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे.
हे आहेत उपोषणात सहभागी
याप्रसंगी दयानंद पाटील, किशोर सैंदाणे, किशोर अहिरराव, प्रमोद पाटील, ललित राणे, संदीप अहिरराव, दिपक मोरे, प्रदीप झांबरे, अकील पटेल, योगीराज पाटील, सुयोग महाजन, एन.सी. जंगले, एन. व्ही. चौधरी, एन. बी. तायडे, निलेश माळी, मंगेश खैरनार, भगवान चौधरी, निलेश भंगाळे, हर्षल पाठक, राहुल वाडिले, नरेंद्र सुर्यवंशी, भानुदास चौधरी, आसिफ तडवी, एन.बी. राणे आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.