मुंबई । भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. जबरदस्त कामगिरी करत जगभरात भारतीय संघाने दबदबा निर्माण केलाय. मात्र त्यानंतरही भारतीय संघाला एक चिंता सतावत आहेच. ती चिंता म्हणजे मध्यम फळीतील फलंदाज. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान भारतीय संघाची ही कमकुवत बाजू समोर आली. 2015 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर फलंदाजीमध्ये चौथ्या क्रमांकासाठी तब्बल 11 फलंदाज वापरण्यात आले. मात्र या स्थानावर कायमस्वरुपी खेळणारा अद्याप एकही फलंदाज नाही. त्यामुळे या क्रमांकावर जुन्या खेळाडूंना खेळवताना, सुरेश रैना आणि युवराजसिंगला संधी द्यावी असे मत भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.इंग्लंडमध्ये 2019 साली होणार्या विश्वचषक स्पर्धेला डोळ्यासमोर ठेवून सध्या निवडसमिती, प्रशिक्षक आणि कर्णधाराची खेळाडूंवर नजर आहे.
प्रत्येक सामन्यात नव्या खेळाडूला चौथ्या क्रमांकावर संधी दिली जातेय. मात्र अद्याप ोणताच निकाल समोर आलेला नाही. यातच माजी क्रिकेटर सुनील गावस्करांच्या मते दोन खेळाडूंचे पुनरागमन होणे गरजेचे आहे. गावस्करांनी काही जुन्या खेळाडूंना पुन्हा संधी दिली जावी असा सल्ला निवड समितीला दिलाय. गावस्कर म्हणाले, चौथ्या क्रमांकावर खेळण्याची जी समस्या आहे ती जुन्या खेळाडूंना संधी देऊन दूर होऊ शकते. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्या सामन्यातील विजयानंतर गावस्कर म्हणाले, भारतीय संघाच्या अडखळत्या मध्यमक्रमाला सांभाळण्यासाठी संघात सुरेश रैना आणि युवराज सिंह यांचे पुनरागमन होणे गरजेचे आहे. हे दोन्ही क्रिकेटर मध्यम फळीतील फलंदाजी सांभाळण्यासोबतच गोंलादाजीतही चांगले योगदान देऊ शकतात.