सुर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात

0

जळगाव । आजकाल मुली फक्त नोकरीवालाच नवरा पाहिजे असा हट्ट धरतात मात्र तो व्यसनी निघाला तर काय फायदा त्यापेक्षा शेतकरी आणि व्यावसायिक मुलांना अधिक पसंती द्या असे आवाहन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. येथील अखिल भारतीय सुर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाच्या राष्ट्रीय स्तरावरील भव्य वधु-वर परिचय मेळावा आज अतिशय उत्साहात संपन्न झाला. यात राज्यमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. वधु वर परिचय मेळाव्यात 200 पेक्षा जास्त युवक युवतींनी परिचय दिला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटसमोरील समाजाच्या मंगल कार्यालयात वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मान्यवरांची होती उपस्थिती
मेळाव्याचे उद्घाटक म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, आमदार राजुमामा भोळे, महापौर ललित कोल्हे उपस्थिात होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी उपाध्यक्ष भरत मराठे हे होते तर व्यासपीठावर अखिल भारतीय सुर्यवंशी क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष भानुदास पाटील, उपाध्यक्ष अंबादास महाजन, बी.बी.पाटील, किसन मराठे, सचिव दिलीप मराठे, सहसचिव संतोष सोनवणे धरणगाव कृउबा समितीचे माजी उपसभापती देविदास मराठे, माजी अध्यक्ष आदी उपस्थित होते.

गरजवंता सदैव मदतीचा हात; मान्यवरांचा सुर
पुढे बोलतांना राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या आई वडीलांचे उपकार मुलांनी कधीच विसरु नये आणि चुकीच्या गोष्टी करु नये असेही आवाहन केले. तर माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी समाजाने हा मेळावा भरविणे ही काळाची गरज असुन मराठा समाजाने यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. यापुढे समाजातील काही अनिष्ठ चालिरिती बंद करण्याला प्राधान्य देण्यात यावे असे सांगितले. आमदार राजु मामा भोळे म्हणाले की, मराठा समाजाला भविष्यात कोणतीही मदत लागली तर आमदार निधीतून देण्याचे आश्‍वासन दिले.

यशस्वितेसाठी यांनी केले प्रयत्न
महापौर ललित कोल्हे यांनी सुर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाला शहरात कोणतीच अडचण भासू देणार नाही आपण मागणी करा ती पुर्ण करण्याचे आश्‍वासन महापौरांनी यावेळी दिले. अखिल भारतीय सुर्यवंशी क्षत्रिय मराठा मंडळ जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजातील विविध स्थानिक मंडळ तसेच समाज बधू-भगिनी व युवकांच्या सहकार्याने हा मेळावा संपन्न झाला. यानिमीत्त वधु-वर परिचय पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यता आले. मेळाव्यास जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे, मुंबई, सुरत, लालबाग-बर्हाणपूर, खरगोन, इंदौर, सह महाराष्ट्रातून तसेच मध्यप्रदेश व गुजरात राज्यातून देखील वधू-वर व पालकांनी सहभाग नोंदविला. प्रास्ताविक उपाध्यक्ष बी.बी.पाटील, सुत्रसंचालन कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष भरत काळे, संतोष मराठे यांनी केले.