सुलवाडे-जामफळ-कानोली प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार

0

शिंदखेडा । तालूक्यातील शेतकर्‍यांना वरदान ठरणार्‍या सुलवाडे-जामफळ-कानोली या प्रकल्पाचा समावेश प्रधामंत्री सिंचन योजनेत करण्यात आला असून पुढील महिन्यात या प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याची माहिती देशाचे संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली. ते शिंदखेडा येथे भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गांधी चौकात आयोजीत जाहिर सभेत बोलत होते. सभेच्या अध्यक्ष अशोक देसले होते.या सभेस जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, माजी महापौर जयश्री अहिरराव, जि.प.सदस्य कामराज निकम, नारायण पाटिल, सुभाष माळी, गटनेते अनिल वानखेडे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रजनी अनिल वानखेडे व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.

राज्यात विकासांची कामे
डॉ.भामरे म्हणाले, भाजपाच्या गेल्या साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात तीसहजार कोटी रुपयांचा निधी राज्याला दिला. यांत अनेक विकासाची कामे राज्यात सुरू आहे. कॉग्रेसच्या काळात सात हजार कोटी रूपये खर्च झालेत तरी देखील तालूक्यासह जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळात जगतो आहे.कॉग्रेसच्या काळातही योजना चांगल्या होत्या परंतू कॉग्रेस नेत्यांची नियत चांगली नसल्याने यशस्वी होवू शकल्या नाहीत.

बेरोजगारांना मिळणार रोजगार
जिल्ह्यातील सर्वात चर्चेत असलेल्या मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी सर्व प्रशासकिय बाबी पूर्ण करण्यात आल्या असून येत्या दोन महिन्यात या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. धुळे जिल्ह्यात सहा राष्ट्रिय महामार्गांना मंजूरी मिळाली आहे. पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल व माझ्या प्रयत्नांने तालूक्यात 250 मॅगावॅट उर्जा निर्मितीचा सौर उर्जा प्रकल्प येत्या काहि दिवसात पूर्ण होवून 400ते 500तरूण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

भ्रष्टाचार निर्मुलनासाठी नोटाबंदी
सत्तर वर्षाच्या काळात कॉग्रेसने भ्रष्टाचाराला खतपाणी घातले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शासनाने भ्रष्टाचार समूळ निपटून काढण्यासाठी नोटाबंदिसारखा कठोर निर्णय घेतला.जगामध्ये सर्वच क्षेत्रात भारताची मान उंचावली आहे. राज्यात असलेल्या भाजपा सरकार कडून विकासाच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध दिला जातो. गेल्या अनेक वर्षा पासून ग्रा.प. व नगरपंचायतीमध्ये कॉग्रेसची सत्ता होती. परंतु विकास कामांचा अनुशेष अद्यापही आहे.

विकासासाठी भाजपला मतदान करा
शहरातील पाणीप्रश्न, भाजी मंडई, रस्ते, आदि विकास कामे तात्काळ होण्यासाठी भाजपाच्या हाती नगरपंचायतीची सत्ता सोपवा, शहराच्या विकासासाठी भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी अनिल वानखेडे व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे व भाजपाला एकहाती सत्ता द्यावी असे आवाहन डॉ.भामरे यांनी केले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद जाधव, कामराज निकम, गटनेते अनिल वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन व आभार प्रदिप दिक्षित यांनी मानले.