सुळे गुरुजी स्कूलने आत्माराम मोरे स्मृती कॅरम स्पर्धा जिंकली

0

मुंबई । दादरच्या आयईएस व्ही.एन.सुळे गुरुजी इंग्लिश हायस्कूलने सेंट जोसेफ हायस्कूलचे अंतिम आव्हान 2-1 असे संपुष्टात आणून स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतरशालेय सांघिक कॅरम स्पर्धा जिंकली. डॉ. अँटोनियो डा सिल्वा हायस्कूल-दादर व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे खासदार राहुल शेवाळे सहकार्याने आयोजित कॅरम स्पर्धेमध्ये उपांत्य उपविजेतेपद चेंबूरनाका मनपा शाळा व नालंदा स्कूल-मुलुंड संघांनी तर उपांत्यपूर्व उपविजेतेपद डॉ. अँटोनियो डा सिल्वा हायस्कूल, सरस्वती हायस्कूल-ठाणे, शारदाश्रम विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, माटुंगा लायन्स पायोनियर इंग्लिश स्कूल संघांनी पटकाविले.

अंतिम सामन्यात आदेश दळवीने रोहन पाटीलला नील गेम देत व्ही.एन.सुळे गुरुजी हायस्कूलला सेंट जोसेफ हायस्कूल विरुद्ध 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसर्‍या एकेरीच्या सामन्यात याद्नेश बेलवलकरने अथर्व खेमकरचा 25-9 असा पराभव करून सेंट जोसेफ हायस्कूलला 1-1 अशी बरोबरी करून दिली. त्यामुळे सुळे गुरुजी हायस्कूलचा पौरस करंगुटकर विरुद्ध सेंट जोसेफ स्कूलचा रिंकू जैन या दोन अव्वल ज्युनियर कॅरमपटूमध्ये अटीतटीचा सामना झाला.

विजयाचे दोलायमान पारडे अखेर पौरसने 17-16 असा विजय मिळवून सुळे गुरुजी हायस्कूलच्या बाजूने झुकविले आणि सुळे गुरुजी हायस्कूल कॅरम संघाने 2-1 अशा विजयासह अजिंक्यपदाला गवसणी घातली.स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जेष्ठकॅरमपटू सुहास कांबळी, प्राचार्या सुसाना गोम्स, गोविंदराव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 20 एप्रिलपासून होणार्‍या आत्माराम मोरे स्मृती चषक शालेय मुंबई सुपर लीग कॅरम स्पर्धेसाठी पहिल्या आठ शालेय संघाना प्रवेश दिला जाणार असल्याचे संयोजकलीलाधर चव्हाण यांनी जाहीर केले.यावेळी भारतीय कॅरम संघाचे यशस्वी माजी प्रशिक्षक सुहास कांबळी यांनी शालेय मुलांना कॅरम खेळाच्या तंत्राविषयी मार्गदर्शन करून महत्वाच्या काही अचूक फटक्याचे प्रात्यक्षिक दाखविले.