सुवर्णकार कारागिरांना कोविड-19 सफल भारत अर्थसहाय्य मदत द्या

0

जळगाव: महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव, अखिल भारतीय अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्था, कर्तव्य प्रतिष्ठान, जळगाव यांच्यावतीने सोने चांदीचे दागिने बनविणाऱ्या सुवर्णकार कारागिरांना कोविड 19 सफल भारत अर्थसहाय्य मदत देण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व आ. राजुमामा भोळे यांना नुकतेच देण्यात आले.

समस्त भारतात सोने- चांदीचे दागिने बनविणारे हजारो गरीब मजूर कारागीर आहेत. मागील 3 महिन्यापासून कोविड 19 या आजारामुळे झालेल्या लोकडाऊनमुळे सर्व मजूर कारागिर घरीच बसून आहेत. अन्य उत्पनाचे काहीच साधन नसून व आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. भारत सरकारने मंजूर केलेल्या उत्पनाच्या पेकेजमध्ये बांधकाम करणारे, फेरीवाले व इतर मजुरांना अर्थसाह्य करिता समाविष्ट केले आहे. त्यात सोने- चांदीचे दागिने बनविणारे गरीब मजूर कारागीरांना समाविष्ट केलेले नाही.
आर्थिक विवंचनेत सापडलेल्या गरीब दागिने घडविणाऱ्या कारागीर बांधवाना जगणे अत्यंत कठीण झाले आहे.

निवेदनाद्वारे केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सक्षम भारत सफल भारत कोविड 19 च्या जाहीर करण्यात आलेल्या पेकेजमध्ये सर्व सोने- चांदीचे दागिने बनविणाऱ्या गरीब मजूर कारागीर बांधवांना समाविष्ट करून आर्थिक सहाय्य-मदत देण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात नमूद आहे.

निवेदन देतेवेळी महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे अध्यक्ष संजय विसपुते, उपाध्यक्ष विजय वानखेडे, सचिव संजय पगार, योगेश भामरे, नंदू बागुल, गोकुळ सोनार, प्रकाश दापोरेकर, सुरेश सोनार, प्रशांत विसपुते आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रसंगी सोशल डिस्टनसिंगची अंमलबजावणी समाज बांधवांनी केली.

निवेदनाच्या प्रती पंतप्रधान,केंद्रीय अर्थमंत्री, पालकमंत्री, जि. जळगाव, खा.उन्मेष पाटील यांनाही रवाना केल्या आहेत.