मुंबई : झी टीव्हीवरून प्रसारित झालेल्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. या मालिकेमध्ये सुशांत आणि अंकिताची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. प्रेक्षकांच्या मागणीचा मान राखत झी टीव्हीने पुन्हा एकदा ही मालिका प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती झी टीव्हीने स्वत: आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा या जोडीला एकत्र पाहाण्याची संधी मिळणार आहे. या मालिकेबरोबरच ‘जोधा अकबर’ ही मालिकेदेखील पुन्हा एकदा नव्याने प्रसारित केली जाणार आहे.
छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात एन्ट्री करणारा सुशांत आता बॉलिवूड चित्रपटांमधूनही प्रेक्षकांची मने जिंकत आहे. आगामी केदारनाथ या चित्रपटातून तो सारा अली खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तर अंकितादेखील मणिकर्णिका या बहुप्रतीक्षीत चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.