पाटना: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दररोज नवनवीन वळण लागत आहे. महाराष्ट्र विरुद्ध बिहार सरकार अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई पोलीस सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी करीत होती. मात्र सुशांत सिंहच्या वडिलांच्या मागणीनंतर बिहार पोलिसांनी याचा तपास सुरु केला आहे. तपासासाठी बिहार पोलीस मुंबईत दाखल झाले आहे. मात्र अजून तपास सुरु झालेला नाही. दरम्यान बिहार सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याची चौकशी सीबीआयकडे देण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस महासंचालकांनी सुशांतसिंहच्या वडिलांशी चर्चा केली. त्यांनी सीबीआय चौकशी करण्यासाठी संमती दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता सीबीआयकडे देण्याची शिफारस करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर वेगवेगळ्या शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर बिहार पोलिसांनीही याचा तपास सुरू केला. मात्र, मुंबई पोलिसांकडून सहकार्य केले जात नसल्याचा आरोप आता बिहार पोलिसांकडून केला जात आहे.
आत्महत्या झाल्यानंतर मुंबई पोलीस याचा तपास करत असून, काही दिवसांपासून सीबीआय चौकशीची मागणी देखील होत आहे. मात्र, राज्य सरकारने त्याला नकार दिलेला आहे.