सुषमा स्वराज यांच्याकडून भारतीय जवानांचा विश्वासघाट- राहुल गांधी

0

नवी दिल्ली-डोकलाम वादावरुन सुषमा स्वराज यांनी लोकसभेत ‘डोकलामचा वाद राजकीय परिपक्वतेने मिटवण्यात आला असून देशाने एक इंचदेखील जमीन गमावलेली नाही, कायम राखली गेली आहे, असे सांगितले होते. सुषमा स्वराज यांनी हे संसदेत स्पष्टीकरण दिले असतानाच दुसरीकडे अमेरिकेने डोकलामसंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले होते. दरम्यान भारत आणि चीनमधील डोकलाम वादावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांच्यावर टीका केली. सुषमा स्वराज यांनी चीनसमोर गुडघे टेकले असून हा भारताच्या शूरवीर जवानांचा विश्वासघात आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

भारत आणि चीनने माघार घेतले असली तरी चीन छुप्या पद्धतीने डोकलाममध्ये सक्रीय होत आहे, असे अमेरिकेने म्हटले होते. याचा दाखला देत राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन सुषमा स्वराज यांच्यावर टीका केली.

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात वुहान येथे अनौपचारिक बैठक का घेण्यात आली, या बैठकीत अजेंडा का ठरवण्यात आला नाही, असा प्रश्न तृणमूल काँग्रेसचे खासदार सुगाता बोस यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना स्वराज म्हणाल्या की, दोन्ही देशांत विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे याच उद्देशाने ही बैठक आयोजित केली होती. बैठक कोणत्याही एका विषयापुरते मर्यादीत न ठेवता महत्त्वाच्या विषयांवर मोकळेपणाने चर्चा होणे अपेक्षित होते. त्यामुळे बैठकीचा अजेंडा ठरवण्यात आला नाही, असे त्यांनी म्हटले होते.