सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी प्रयत्न करा

0

जळगाव। आजचा युग हा डिजीटल युग म्हणून ओळखला जातो. सर्व क्षेत्रात तंत्रज्ञानाची क्रांती झालेली आहे. शैक्षणिक क्षेत्रातही तंत्रज्ञानाची यशस्वी वाटचाल सुरु आहे. डिजीटल शिक्षणासोबतच संस्कारक्षम शिक्षण महत्त्वाचे असून अशा पध्दतीच्या शिक्षणाचा अभाव सध्याच्या शिक्षण पध्दतीत आहे. पुरागामी म्हणुन संबोधल्या जाणार्‍या समाजात आजही महिलांना हीन दर्जाची वागणुक दिली जाते. महिलांकडे बघण्याचा वाईट दृष्टीकोन अद्यापही कायम असून यात बदल व्हायला हवे. सुसंस्कृत समाज घडविणे गरजेचे असून प्रत्येक शिक्षकांना त्यासाठी व्यक्तिगत प्रयत्न करायला हवे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले. उज्ज्वल एज्युकेशन ट्रस्टतर्फे उपलब्ध झालेल्या 50 हजार किंमतीचे दहा टॅबलेटचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. सर्व शाळा डिजीटल करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असल्याने देण्यात आलेल्या टॅबलेटचा उपयोग चांगल्या कामासाठी व्हायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सुत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी तर आभार उपशिक्षणाधिकारी ए.बी.गायकवाड यांनी केले.

अन्याय झाल्याचे मान्य
जिल्हा अंतर्गत शिक्षकांची बदली ही शासन निकषानुसार करण्यात आली आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार व जीआरमधील निकषानुसार बदली केलेली आहे. भावनिक दृष्ट्या विचार केल्यास काही शिक्षकांवर बदली प्रक्रीयेत अन्याय झाला आहे हे मी मान्य करतो मात्र अनेक वर्षापासून अवघड व पेसा क्षेत्रात शिक्षकांची कमतरता होती ती भरुन काढली आहे. बदली ही पारदर्शक झाली असल्याचे सीईओ दिवेगावकर यांनी सांगितले.

स्वच्छतेकडे लक्ष द्या
शासनाने सर्व शाळा डिजीटल करण्याचा संकल्प केला असला तरी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हागणदारीमुक्त करण्याचे देखील शासनाचे उद्दिष्ट असल्याने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे असे ग्रामविकास विभागाचे अव्वर सचिव भरत पाटील यांनी सांगितले. शहरात येतांना अस्वच्छता बघून अद्यापही जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत खुप मागे असल्याचे दिसून येते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

यांना मिळाले टॅबलेट
भुसावळ तालुक्यातील दहा शाळांना टॅबलेट देण्यात आले आहे. यात खेडी, झेडपी कन्या शाळा वरणगाव, अंजनसोंडे, मानपुर, पिंपळगाव बु., पिंपळगाव खु., बोर्डी, महादेवमाळ, बेलवाय, कंडारी आदी शाळांच्या मुख्याध्यापकांना टॅबलेट देण्यात आले. तसेच धरणगाव तालुक्यातील पवन दिनकर पाटील, सतिष शिवाजी कोळी हे दोन विद्यार्थी विशेष प्राविण्यासह नवोद्य परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचा गौरव करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
दहा शाळेतील मुख्याध्यापकांना टॅबलेटचे वाटप करण्यात आले यावेळी शिक्षण समिती सभापती पोपट भोळे, ग्रामविकास विभागाचे अव्वर सचिव भरत पाटील, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर, शिक्षण समिती सदस्य माधुरी अत्तरदे, रविंद्र पाटील, प्रमिला पाटील, विजया पाटील, गजेंद्र पाटील, हरिष पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन, उपशिक्षणाधिकारी डी.एम.देवांग, ए.बी.गायकवाड, आरोग्य अधिकारी बी.आर.पाटील यांच्यासह मुख्याध्यापक उपस्थित होते.