सुसज्ज हॉस्पिटल, हॉटेल्स, मंगल कार्यालय ताब्यात घेण्यासाठी पत्र

0

जळगाव – कोरोनाची भीती असताना जिल्हा रुग्णालयात सुविधा नसल्याची बाब आज जनशक्तीने प्रकाशात आणल्यानंतर जिल्ह्यातील सुसज्ज हॉस्पिटल, हॉटेल व मंगल कार्यालये ताब्यात घेण्याची मागणी दीपक साखरे यांनी केली आहे. या ठिकाणी विलगीकरण कक्ष सुरू करता येईल, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

साखरे यांनी जिल्हाधिकारी यांना उद्देशून म्हटले आहे की, वृत्तपत्रातून वाचण्यात आले की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेडची संख्या जिल्ह्याच्या तुलनेत तशी कमी आहे तसेच व्हेंटिलेटर पण एकच आहे. ही परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. आपल्या जिल्ह्यात मुंबई, पुणेसारखी स्थिती ओढवली तर काय होईल? प्रशासकीय सर्वोच अधिकारी म्हणून आपल्याला विनंती आहे की, या जिल्ह्यात किमान तालुका स्तरावरील सर्व मल्टीस्पेशालिटी व अद्यावत सुविधा असलेले सर्व खासगी हॉस्पिटलचे आयसीयू बेड, तसेच सर्व सुविधा असलेले हॉटेल्स व आयसोलेशन वॉर्ड म्हणून तयार होऊ शकतील, असे मंगल कार्यालय, सामाजिक भवन यांची यादी करून ते आपल्या ताब्यात घ्यावे.

…तर यंत्रणेवरचा ताण कमी होईल

आज जिल्हाभरात किमान 30 तरी मल्टी स्पेशलाटी हॉस्पिटल, तितकेच मोठे हॉटेल, 50 च्या वर मंगल कार्यलय अशी आहेत की, या सर्व ठिकाणी जर आपण नियोजन करून ठेवल्यास किमान 500 ते 1000 रुग्णांची व्यवस्था उभी राहील. याचबरोबर जळगाव शहरातील सर्व खासगी डॉक्टर, खासगी नर्स यांची कुमकसुद्धा या सर्व नियोजनात वापर करून घेता येईल. यामुळे सरकारी यंत्रणेचा ताण काही प्रमाणात कमी होईल. तसेच अनेक सामाजिक संघटना आपण आवाहन केल्यास आपल्या मदतीला तयार होतील यात शंका नाही.

दीपक साखरे