शहादा । तालुक्यातील दरा येथील सुसरी प्रकल्पातून वाकीनदीत पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. या मागणीची जिल्हाधिकार्यांनी दखल घेवुन मे महिन्यात जाणवणारी तिव्र पाणी टंचाई दुर करण्यासाठी सुसरी प्रकल्पातील पाणी वाकीनदीत सोडले आहे. यामुळे परिसरातील 35 गावांमधील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे.शहादा तालुक्याला संजीवनी देणारे प्रकल्प म्हणून दरा येथील सुसरी प्रकल्प आहे.
या प्रकल्पात पाणी असतांनाही नदीत सोडण्यात येत नसल्याने शहादा तालुक्यातील 35 गावांना तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. प्रकल्पात पाणी असतांनाही शेतकरी त्यापासून वंचित राहत होते. म्हणुन आगामी काळातील पाणी टंचाईशी परिस्थिती लक्षात घेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दि.24 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे निवेदनाद्वारे सदर प्रकल्पातील पाणी नदीत सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेवून जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना आदेश देवून प्रकल्पातील पाणी सोडण्याचे सांगितले. त्यानुसार संबंधितांनी अंमलबजावणी करीत सुसरी प्रकल्पातील पाणी वाकी नदीत सोडले आहे. सुसरी धरणात पाणी साठयाची क्षमता 384 द.ल.घ.मि. एवढी इतकी आहे. सुसरी धरणात आज अखेर काल दि.5 रोजी अखेरपर्यंत 430.87 द.ल.घ.फु.इतका पाणीसाठा आहे. सर्व्हिसगेटद्वारे 2 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी शरद सोनवणे, शाखा अभियंता डी.एन.मोरे, पी.बी.पाटील उपस्थित होते. शेतकर्यांची अडचण लक्षात घेवून संघटनेने केलेल्या मागणीची दखल घेत पाणी सोडल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी, शहादा तालुकाध्यक्ष वसंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नथ्थु पाटील, जिल्हा सरचिटणीस रविंद्र पाटील व परिवर्धातील शेतकर्यांनी आभार मानले आहे.