सूचना फलकाच्या अभावामुळे खोपी उड्डाणपुलावर वाढले अपघात

0

खेड शिवापूर । पुणे- सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ खोपी फाट्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी सूचना फलक न लावल्याने पुलावरून वाहने जात आहेत. त्यामुळे अपघात होत असून प्रवासी जखमी होत आहेत. वाहनांचेही नुकसान होत आहे.

वाहनांचे नुकसान
खेड-शिवापूर टोल नाक्याजवळील खोपी फाट्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. पुण्याकडून सातार्‍याकडे जाणार्‍या उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सातार्‍याकडून पुण्याकडे जाणार्‍या उड्डाणपुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. परंतु या उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याचे अथवा धोक्याबाबतचे असे कुठल्याही प्रकारचे सूचना फलक येथे लावलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक वाहने या उड्डाणपुलावरून जात असून, पुढे अडकून पडून वाहनांचे अपघात होत आहेत.

ग्रामस्थ संतप्त
उड्डाणपुलाचे काम रिलायन्स इंफ्रा कंपनीकडे आहे. ही बाब त्यांच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली असता, संबंधित अधिकार्‍यांनी उर्मट भाषा वापरल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. दरम्यान संबंधित अधिकर्‍यांनी उड्डाणपुलाच्या जवळील धोक्याच्या ठिकाणी आता आडवे बॅरल लावले असून आणि येथे रिबिन बांधण्यात आली आहे. हे या आधीच केले असते तर अपघात घडले नसते, असे काही प्रवाशांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.