जळगाव। शहरात जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयक्त किशोर राजे निंबाळकर यांनी स्वच्छता मोहिम सुरू केली आहे. यानुसार बळीराम पेठ व परिसरात महानगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. स्वच्छतेसाठी महानगरपालिकेचे कर्मचारी सकाळी 6 वाजेपासूनच रस्त्यांवर साफसफाई करण्यासाठी हजर होते. जिल्हाधिकारी यांनी यावेळी फुले मार्केटची पहाणी केली. या पहाणीत त्यांना मार्केटमध्ये सर्वत्र घाण, साफ सफाई नसणे, सांडपाण्याची विल्हेवाट आदी समस्यांबाबत जिल्हाधिकार्यांना नागरिकांनी तक्रार केली होती. यानुसार जिल्हाधिकार्यांनी फुले मार्केटची पाहणी केली असता, घाणीचे साम्राज्य आढळून आले. त्यांनी तातडीने प्रांतअधिकारी जलज शर्मा यांना बोलावून घेत मार्केट दाखविले. त्यामुळे प्रांतअधिकारी महानगरपालिकेला नोटीस बजावित सोमवारपर्यंत मार्केट स्वच्छ करण्याची नोटीस दिली. अन्यथा कलम 133 नुसार मार्केट बंद करण्याचा इशारा दिला आहे.
प्रभागनिहाय स्वच्छता करा
आयुक्त निंबाळकर यांनी शहरात प्रभागनिहाय स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या अधिकार्यांना दिल्या होत्या. त्यानुसार आज शनिवारी सकाळी 6 वाजता बळीरामपेठ, फुले मार्केट परिसरात सवच्छता मोहीमेला सुरुवात करण्यात आली. सकाळी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर शहर अभियंता सुनिल भोळे, सहाय्यक उपायुक्त चंद्रकांत कहार, आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील, अतिक्रमण अधिक्षक एच.एम. खान यांच्यासह सर्व आरोग्य निरिक्षक, बांधकाम अभियंते, नगररचना अभियंते उपस्थित होते.