सेक्टर दोनमधील बाधितांचे पुनर्वसन होणार

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सेक्टर क्रमांक दोनमधील बाधितांच्या पुनर्वसनासाठी सेक्टर 11 मधील 14 हजार 784 चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके यांनी दिली.

पाठपुराव्याला यश
प्राधिकरण सेक्टर क्रमांक दोनमधील एकूण 128 कुटुंबांची घरे स्पाईन रस्त्यामुळे बाधित होत होती. या घरांच्या पुनर्वसनाचा तिढा सुटत नसल्यामुळे रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान, भाजपचे सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनासह शासकीय पातळीवर पाठपुरावा केला. कोणत्याही परिस्थिती बाधित कुटुंबीयांचे नुकसान न होऊ देता, या रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला. त्याला अखेर यश मिळाले आहे.

सेक्टर 11 मध्ये पुनर्वसन
प्राधिकरणाच्या सभेमध्ये सेक्टर दोनमधील 128 कुटुंबांचे पुनर्वसन सेक्टर 11 मध्ये करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने अगोदरच 16 कोटी 52 लाख रुपये प्राधिकरणाकडे भरले आहेत. तसेच, आणखी 7 हजार 400 चौरस मीटर अतिरिक्त जागेची मागणी प्राधिकरणाकडे केली आहे. त्यालादेखील प्रशासनाने अनुकूलता दर्शवली आहे. याबाबतचा पूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शासन दरबारी पाठपुरावा करून हा प्रश्नदेखील मार्गी लावू, असे सुतोवाच आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.