मुक्ताईनगर । तालुक्यातील काही खाजगी केबल चालकांकडून नवीन सेटअप बॉक्स बसविण्यासाठी केबलधारकांकडून जास्तीचे पैसे उकळले जात आहे. त्यामुळेे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून ग्राहकांची लूट केली जात आहे. अलिकडे देशभरात शहरी व ग्रामीण भागात दुरचित्रवाहिनी पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्सची सक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातही दुरचित्रवाहिनीवरील धारावाहिकांपासून ते सिनेमा, चित्रपट मनोरंजन करुन घेण्यासाठी व माहिती मिळविण्यासाठी बातम्यांवर अवलंबून राहिले आहे.
केबल चालकांची मनमानी
नागरिकांच्या या आवडीवर डल्ला मारण्यासाठी सरसावलेल्या केबल ऑपरेटरांवर अंकुश आणण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने शोधून आणलेल्या सेट टॉप बॉक्सद्वारे अव्वाच्या सव्वा वसुली करुन केबल चालकांकडून जास्तीचे पैसे उकळले जात आहे.
मध्यस्थ असलेल्या केबलचालकांवर प्रतिबंध येणार
देशभरात दुरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी व आवश्यक ती मनोरंजन कर वसूल करुन सरकारी तिजोरीत कराचा भरणा होण्यासाठी शासनाने टप्प्या-टप्प्याने शहरी तसेच ग्रामीण भागात सेट टॉप बॉक्स बसविण्याची अंमलबजावणी सुरु केली. यात ग्राहकांना आपल्या पसंतीचे कार्यक्रम पाहण्याची व त्यावरच शासनाचा कर भरण्याच्या या प्रकारामुळे मध्यस्थ असलेले केबलचालकांवर प्रतिबंध येणार आहे.
कारवाई करण्याची गरज
केबल चालकांद्वारे परिसरातील अनेक खेड्यांमध्ये दुरचित्रवाहिनीच्या जोडण्या पसरविल्या जात आहे. अलिकडेच शासनाने प्रत्येक ग्राहकांच्या दुरदर्शन संचासाठी सेट टॉप बॉक्स सक्तिचा असल्याचा लाभ उठवत केबल चालकांकडून सेट टॉप बॉक्स आपल्याकडूनच घेण्याची सक्ती करीत एका संचासाठी 1 हजार 600 ते 1 हजार 800 रुपयांपर्यंत दर आकारला जात आहे. प्रत्यक्षात हा संच बाजारात 600 ते 800 रुपयांपर्यंत मिळत असतांना सुध्दा ग्राहकांना नाईलाजास्तव जास्तीचे पैसे भरुन संच खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे तहसिलदारांनी याकडे लक्ष देवून ग्राहकांची पिळवणूक थांबविण्याची गरज आहे.