राजगुरुनगर । राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी खेड तालुका शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी राजगुरूनगर येथील महा ई सेवा केंद्राला भेट दिली. कर्जमाफीसाठी सुरू असलेली ऑनलाईन प्रक्रिया, शेतकर्यांना येणार्या अडचणी तसेच प्रशासकीय नियोजन याबाबत परिपूर्ण माहिती घेऊन शेतकर्यांना लवकरात लवकर कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, जिल्हा समन्वयक अॅड. गणेश सांडभोर, खेड तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळ पाहणीसाठी गेले होते.सुरेश चव्हाण, विजया शिंदे, एल. बी. तनपुरे, किरण गवारे, सुनील टाकळकर, संदीप पगडे, संतोष वाळुंज, कैलास गोपाळे, गोरक्षनाथ सुकाळे, महेंद्र घोलप, श्रीनाथ लांडे यांच्यासह कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
आकडेवारी फसवी
राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची आकडेवारी फसवी आहे. शेतकर्यांना ऑनलाईन अर्ज करताना व माहिती भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबतच्या वस्तुस्थितीची जाणीव शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी खेडचे तहसीलदार सुनील जोशी यांना करून दिली. तहसीलदारांसोबत चर्चा केल्यानंतर सर्व पदाधिकार्यांनी सहाय्यक निबंधक श्रीकांत श्रीखंडे यांचीही भेट घेतली. आजवर किती शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, याची आकडेवारी उपलब्ध करून द्यावी, सर्व्हर वेळोवेळी डाऊन होत असल्याने ऑफलाईन अर्ज भरण्याची सवलत द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.