सेना-भाजपची युती तुटली

0

मुंबई । अखेर ‘राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापुढे स्बळावर लढणार,’ अशी डरकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रजासत्ताकदिनी आयोजित केलेल्या विशेष मेळाव्यात फोडली. गोरेगावमध्ये पार पडलेल्या पदाधिकारी मेळाव्यात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत आणि जयघोषात ही घोषणा झाली. मुंबईसह 10 महापालिकांच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष आता रंगणार आहे.
विशेष म्हणजे गोरेगावातील शिवसैनिक मेळाव्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. शिवसैनिकांच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले. आणि याच आवेशपूर्ण वातावरणात उद्धव ठाकरेंनी स्वबळावर भगवा फडणविण्याची घोषणा केली. बर्‍याच काळानंतर उद्धव ठाकरेंनी प्रथमच इतके आक्रमक आणि ठाकरी शैलीची झालर असलेले भाषण केले. दरम्यान, युती तुटल्यानंतर आता दोन्ही पक्ष एकमेकांवर तुटून पडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

‘गेली 25 वर्षे शिवसेना युतीत सडली’
‘गेली 25 वर्षे शिवसेना युतीत सडली. पण आता ही फरफट होणार नाही. तुम्ही मला वचन देत असाल तर आज मी निर्णय घेतो आहे की, आता यापुढे शिवसेना महाराष्ट्रात भगवा फडकवेल. कोणाच्याही समोर युतीसाठी कटोरा घेऊन जाणार नाही. महाराष्ट्रात कुठेही यापुढे मी युती करणार नाही.’ असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपशी काडीमोड घेतल्याचे जाहीर केले. ‘तमिळनाडूमध्ये बैलापेक्षा जास्त पिसाळून जनता रस्त्यावर उतरली आहे, आपल्यालाही उधळलेल्या बैलाला वेसण घालायची आहे, हेदेखील जलिकट्टूच आहे आणि जर या बैलाला वेसण घालायची हिंमत मनगटात नसेल तर हातामध्ये भगवा पकडू नका.’ असे ते म्हणाले.

सरकारी कार्यालयातील देवबंदी उठली
सरकारी कार्यालयात देवदवतांचे फोटो लावायला बंदी करणारा आदेश मागे घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. वर्षा बंगल्यावर या विषयावर चर्चा करण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने याबाबतची माहिती दिली आहे. या शिष्टमंडळात शिवसेनेच्या सुभाष देसाई, रामदास कदम, दीपक सावंत, दिवाकर रावते आदी नेत्यांचा समावेश होता.

…मी दात पाडायचे काम करीन
स्वबळाची घोषणा करताना त्यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहनही केले. आईसमान असलेल्या संघटनेच्या कुशित स्वार्थासाठी लाथ मारू नका, असे ते म्हणाले. तुम्ही शिवसेनेची वज्रमूठ मला द्या, मी दात पाडायचे काम करीन, असे म्हणताच सभागृहात एकच जल्लोष झाला. ‘युतीच्या बैठकीत 114 जागांची मागणी भाजपकडून करण्यात आली. हा शिवसेनेचा अपमान होता. त्यानंतर कोणताही फोन मला आला नाही. मी निखार्‍यावर चालणार आहे. तुम्हालाही माझ्यासोबत निखार्‍यासोबत चालावे लागणार आहे. त्यामुळे यापुढे शिवसेना महाराष्ट्रात स्वबळावर भगवा फडकवेल. शिवसेना महाराष्ट्रात कुठेही युती करणार नाही. यापुढे कुणासमोरही कटोरा पसरणार नाही.’ अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारमध्ये हिम्मत असेल तर राज्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांना कॅबिनेटच्या बैठकीत घ्या, पत्रकारांना बोलवा, लोकायुक्तांनाही बोलवा मग घोटाळ्याचे आरोप होणार नाही.’ अशा फैरी त्यांनी झाडल्या. ‘काल देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये एक पुरस्कार ‘गुरूदक्षिणा’ म्हणून दिला गेला अशी चर्चा आहे.’ असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

सेना-मनसेच्या युतीची चर्चा
भाजपाशी युती तोडल्यानंतर शिवसेना आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. मनसेने शिवसेनेला युतीचा प्रस्ताव पाठवला आहे, अशी चर्चा सुरू झाली. शिवसेनेकडून याबाबत अद्याप प्रतिसाद नसल्याचे असेही सांगितले जात आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता आमच्याकडून तसा कोणताही प्रस्ताव शिवसेनेला पाठविण्यात आलेला नाही, असे त्यांनी सांगितले.