मुंबई – राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने दिल्ली दरबारी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर समाधानी झालेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता सेना-भाजपातील संबंध सुधारण्यास सुरूवात झाल्याचे संकेत दिले. युती आता ‘व्हेंटिलेटर’वरून ‘कासव’गतीने पूर्वपदावर येत आहे, अशी मिश्किल टिपणी त्यांनी आज केली.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेत्या मराठी कलाकारांनी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री, या निवासस्थानी भेट घेतली. व्हेंटिलेटर, कासव, यासारखे चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये आकर्षण ठरले. याचा हवाला देत प्रसिद्धीमाध्यमांकडून ‘व्हेंटिलेटर’वर असलेली शिवसेना-भाजप युती आता सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, शिवसेना-भाजप युती ‘कासव’गतीने पूर्वपदावर येत आहे’.
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक व कलाकार यांचे शिवसेनेतर्फे कौतुक करण्यात येत आहे. शिवसेनेच्या चित्रपट शाखेकडून एप्रिल महिन्याच्या अखेरीस मुंबईत या चित्रपटांचा एक महोत्सव आयोजित करण्यात येईल, असेही ठाकरे म्हणाले. कुलभूषण जाधव यांच्याबाबत फक्त पत्रव्यवहार करून चालणार नाही. पाकिस्तानला एकदा कायमचा धडा शिकवला पाहिजे, असेही ते म्हणाले.