मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र सरकार स्थापनेपासूनच महाविकास आघाडीतील पक्षात अंतर्गत मतभेद आणि वाद होतांना दिसत आहे. स्थानिक राजकारणातील वाद नेहमीचेच झाले आहे. दरम्यान आता शिवसेना आणी राष्ट्रवादीतील वाद चांगलाच टोकाला गेला आहे. मतदारसंघात होणाऱ्या विकासकामांच्या भूमिपूजनाला निमंत्रण देत नसल्याने, सातत्याने कार्यक्रमाला डावलत असल्याने राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेना आमदार योगेश कदम यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला आहे.
दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम आणि खासदार सुनील तटकरे यांच्यातील वाद टोकाला गेले आहे. ‘माझ्या मतदार संघातील विकास कामांचे भूमिपूजन किंवा लोकार्पण मला डावलून केले जाते. मतदार संघाच्या कामासाठी मी प्रयत्न केले आहे, मात्र खासदाराकडून मला डावलले जाते असे आरोप आमदार योगेश कदम यांनी केले आहे.
माझ्या मतदारसंघात होणाऱ्या शासकीय कार्यक्रमाला डावलणे, कार्यक्रमाचं निमंत्रण न देणे हा माझ्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळेच २० ऑक्टोबरला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. सुनील तटकरे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची विनंती आमदार योगेश कदम यांनी केली आहे.