शिंदखेडा । शिवसेना हा शेतकरी व कष्टकर्यांचा पक्ष असून सर्व सामान्य कार्यकर्ता देखील आमदार म्हणून निवडून येवू शकतो, त्यामुळे पैश्याच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही. आगामी विधानसभा निवडणूकीत पैशाची गुर्मी दाखवणार्यांच्या पैशाला कागदाची किंमत राहणार नाही. राज्यातील भाजपा सरकारने सामान्य जनतेच्या विरोधात घेतलेल्या निर्णयाला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. राज्यात शेतकर्यांची कर्जमाफी ही केवळ सेनेने केलेल्या आंदोलनाचे यश असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. शिंदखेडा येथे जिल्हा ग्रामीणच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते जिल्हा दौर्यावर होते त्याप्रसंगी ते बोलत होते. शिंदखेडा नगरपंचायतीची निवडणूक महत्वाची आहे. ही निवडणूक जिंकून सेनेचा झंझावात निर्माण झाला आहे हे दाखवण्याची संधी आहे. या संधीचे कार्यकर्त्यानी सोने करावे असे आवाहन त्यांनी केले.
यांची होती उपस्थिती
भाजपाच्या स्थानिक आमदारांनी या भागात विकासाची कामे केली नसल्याचा आरोप केला. यावेळी राज्यमंत्री दादासाहेब भुसे, जिल्हा प्रमुख हिलाल माळी, जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, माजी आमदार शरद पाटील, हेमंत साळूंके, सर्जराव पाटील, अतूल सोनावणे, वामन देसले, विश्वनाथ पाटील, छोटू पाटील, महेश मिस्तरी, शानाभाऊ सोनावणे, मंगेश पवार, मयूर निकम आदी उपस्थित होते. शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणूकीत शिवसेना सर्व 18 जागांवर स्वतंत्र उमेदवार देवून निवडणूक लढविणार असल्याचे मेळाव्यात जाहीर करण्यात आले.
दोन्ही काँग्रेस दलाल
राज्यातील कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजपा सरकारने दलाल निर्माण केले. राज्यातील सरकार हे रयतेचे राज्य आहे अशी खोटी वल्गना हे सरकार करीत आहेत. अनेक लोकाभूमीख योजना सुरू केल्याचे चित्र निर्माण केले जात आहेत. या योजनांचा लाभ जनतेपर्यंत प्रत्यक्षात पोहोचलाच नाही. मात्र मोठमोठ्या जाहिराती केल्या जात आहेत 2019च्या विधानसभा निवडणूकीत केंद्रात कोणाची सत्ता असेल हे शिवसेना ठरविणार आहे तर राज्यात शिवसेनेचीच सत्ता असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
घोषणा हवेतच
मोदी सरकारने नोटा बंदीचा निर्णय घेवून देशात पंधरा लाख लोकांना बेरोजगार केल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला. काळा पैसा बाहेर काढणार ही घोषणा हवेतच विरली आहे. केंद्रशासनाने वस्तूंवरील कर केवळ गुजरात मध्ये होत असलेल्या निवडणूकीत पराभावाच्या भितीमूळे कमी केले आहेत. निवडणूक संपली की पून्हा कर ‘जैसे थे’ होणार त्यामुळे ह्या शासनावर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले. गेल्या निवडणूकीत राहूल गांधीमुळे मोदींची सत्ता आली आता उलट परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.