सध्या देशामध्ये विविध पुतळ्यांवरून गोंधळ सुरु असताना अरबी समुद्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याच्या उंचीवरून विधानसभेत चांगलेच रणकंदन झाले. अरबी समुद्रात होणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची ११२ फुटांनी कमी केली असल्याची माहिती आज समोर आली आहे. सोबतच शिवस्मारकातील ‘आंतरराष्ट्रीय स्मारक’ हा शब्द काढून सरकारने ‘अश्वारूढ पुतळा’ असा ठेवला असल्याचेही समोर आले आहे. खरतर पुतळे उभारल्याने विचार रुजत नसतात आणि पुतळे उखडल्याने विचार नष्टही होत नसतात हे मागेच एकदा मी लिहिले होते. अगदी तसेच पुतळ्याची उंची कमी केल्याने महाराजांच्या विचारांची उंची कमी होणारी नाही. मात्र आपल्या राजकीय उद्देशासाठी महाराजांच्या नावाचा जागोजागी उल्लेख करणाऱ्या लोकांची संदिग्ध भूमिका ही चाट करणारी असते. आज शिवसेनेची भूमिका पाहून असेच काहीसे चाट पडल्यागत झालेय.
छत्रपतींचे नाव घेऊन राज्य करणाऱ्या आणि सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेची भूमिका मात्र यावेळी शांततेची असल्याने आश्चर्य वाटले. महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करणारी सेना महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात काहीही बोलत नाही ही गोष्ट खरतर विश्वास न बसण्याजोगीच आहे. मात्र शिवसेनेचा असा पलटी झालेला टांगा केवळ याच प्रकरणाने नाही तर नानार या कोकणातील प्रकल्पाच्या मुद्द्यावरून देखील सेनेचे ‘करून न दाखवेन अधोरेखित होतेय. कोकणवासीयांचा विरोध असलेल्या या प्रकल्पाच्या बाबत शिवसेनेचे आधीच हसू झालेय. उद्योगमंत्री तर पुरते हैराण झालेत. बाहेर या प्रकल्पाबाबत विरोधाची गर्जना करणारे शिवसेनेचे एकही सदस्य सभागृहात मात्र या विषयावर असलेल्या लक्षवेधी दरम्यान उपस्थित नसतात हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपल्या राजकारणाची सुरुवात करणाऱ्या सेनेच्या सदस्यांनी स्मारकातील पुतळ्याच्या उंचीवर घेतलेली शांती त्यांची राजकीय उंची अधोरेखित करत होती.
हे देखील वाचा
शिवस्मारकाची उंची कमी केली जात आहे. जगातले सर्वात उंच स्मारक बनले पाहिजे, त्याची इतिहासात नोंद झाली पाहिजे. उंची कमी करण्याचा प्रयत्न केला तर जनता तुम्हाला माफ करणार नाही त्याची किंमत मोजावी लागेल असे ठणकावून सांगणारे विरोधकांच्या कार्यप्रणालीवरही या निमित्ताने बोलावे लागेल. २००१ मध्ये हे स्मारक उभारण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर लेटलतिफीत हे स्मारक अजूनही कागदी दस्तावेजात अडकून पडलेय. आज वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मी सरकारच्या माध्यमातून जनतेला आश्वस्त करतो छत्रपतींचा हा पुतळा जगातील सर्वात मोठा पुतळा असेल असे सांगितले. यावेळी 2001 मध्ये हे स्मारक उभारण्याचा निर्णय झाला आणि कार्यारंभ आदेश २०१८ मध्ये निघतो हे दुर्दैवी आहे,असा आरोप करत मागच्या सरकारच्या वतीने मी जनतेची माफी मागतो, असा लगावलेला टोला हा विरोधकांसह शिवसेनेला देखील होता की काय? असे वाटून गेले.
– निलेश झालटे
![](https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/images/cleardot.gif)