मुंबई : भाजप-शिवसेनेत सत्ता स्थापनेवरून सुरु असलेली रस्सीखेच अद्याप थांबलेली नाही. दोन्ही पक्षाकडून दररोज नवनवीन वक्तव्य समोर येत आहे. दरम्यान आज पुन्हा शिवसेनेने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेने ठरवले तर आवश्यक ते बहुमत सिद्ध करुन सत्ता स्थापन करू शकते असा दावा केला आहे. राऊत यांनी आज शुक्रवारी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीपूर्वी आमचा भाजपसोबत सत्तेच्या वाटपाबाबत 50-50 चा फॉर्म्युला ठरला आहे. संपूर्ण राज्यासमोर, माध्यमांसमोर आम्ही दोन्ही पक्षांनी सत्तेच्या समसमान वाटपाबाबतचा फॉर्म्युला मान्य केला आहे. जर समोरचा पक्ष त्या फॉर्म्युलाचे पालन करत नसेल तर आमच्यासमोर इतर पर्याय खुले आहेत. भाजपने ठरलेल्या फॉर्म्युलाचे पालन करुन, सत्तास्थापन करावी असेही त्यांनी सांगितले आहे.
पवारांना भेटण्यात गैर काय?
काल गुरुवारी संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात एक गुप्त बैठक झाली होती. याबाबत माध्यमांनी संजय राऊतांना विचारले असता, त्यांनी शरद पवारांना भेटण्यामागे राजकीय हेतू नव्हता. परंतु त्यांना भेटण्यात गैर काय आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.