सेनेने राज ठाकरेला दिले खोचक प्रत्युत्तर; दीड शहाणा म्हणून केली तुलना

0

मुंबई : संपूर्ण राज्यात दुष्काळ आहे असतांना सरकार जलदगतीने उपाययोजना करत नाही. दुष्काळाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना सत्तेत राहून काय करते आहे असा सवाल केला होता. राज ठाकरे यांच्या या प्रश्नाला शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून अतिशय खोचक प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते, असे उगाचच तोंडाचे डबडे वाजवत राहणाऱ्या दीड शहाण्यांनी दुष्काळाच्या मुद्दय़ावरून शिवसेनेने उठवलेला आवाज आधी समजून घ्यावा, असे म्हटले आहे.

राज्यावर दुष्काळ ही मोठी आपत्ती कोसळली आहे. ही काही श्रेय घेण्याची लढाई नव्हे, असे म्हणत शिवसेनेने भाजपचेही कान टोचले आहेत.

तसेच जलाशये, छोटी-मोठी धरणे, पावसाळाअखेरीसच कोरडी पडली आहेत. त्यातून कंत्राटदारांचे खिसे जरूर गरम झाले, पण भूगर्भातील पाणीपातळी काही वाढली नसल्याची टीकाही सेनेने केली आहे. दुष्काळ जाहीर करण्य़ासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल करत शेतजमिनींचे हे वाळवंट उघड्या डोळ्यांनी धडधडीत दिसत असताना ‘दुष्काळसदृश’ आणि सरकार ‘अदृश्य’ असा खेळ का मांडला जात आहे? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.