गेली २ वर्षे नागपूर, अहमदाबाद, धुळे येथे प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे ~
मुंबई : शिक्षण आणि उद्योगांमधील दरी कमी करण्यासाठी आघाडीवर काम करणा-या सेफएज्युकेटने कंटेनर स्कूल प्रशिक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सादर केला. कंटेनर स्कूल प्रशिक्षण कार्यक्रम हा सेफएज्युकेटचा एक नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. यामध्ये वर्ग रीसायकल केलेल्या कंटेनरचे बनलेले असतात व त्यांचा उपयोग कौशल्य विकास केंद्रासारखा केला जातो. ही संकल्पना २०१५ मध्ये सुरू झाली होती आणि ती खूप यशस्वी ठरली होती. दोन वर्षांच्या कालावधील ग्रामीण आणि टिअर ३ शहरातील ३५,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून या अभिनव प्रयोगाचे खूप कौतुक केले जात आहे कारण यात कौशल्य विकसित करण्याची क्षमता आहे.
कंटेनर स्कूल कार्यक्रमाच्या दुस-या टप्प्याचे लक्ष्य आहे भौगोलिक दृष्ट्या प्रसार करणे आणि लाभार्थींची संख्या ७०,००० पर्यंत वाढविण्याचे आहे. रीसायकल केलेले कंटेनर शाळेच्या वर्गात आणि प्रयोगशाळेत रूपांतरित करण्याच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेमुळे कौशल्याची आवश्यकता भरून काढण्यासाठी नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यात लागणारा खर्च आणि प्रयत्न हे दोन्हीही वाचू शकेल. ते मॉड्यूलर स्वरूपाचे असल्यामुळे त्याचे भाग सुटे करून ते आवश्यकतेनुसार पुन्हा दुस-या जागी उभारता येऊ शकते. गेली २ वर्षे नागपूर, अहमदाबाद, धुळे, सवाई माधोपूर आणि जमशेद्पूर यांसारख्या २० ठिकाणी प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे.
सेफएज्युकेटच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दिव्या जैन म्हणाल्या, “एक सामाजिक एंटरप्राइज म्हणून सेफएज्युकेट विद्यार्थ्यांना लॉजीस्टिक्स, रीटेल, ई-कॉमर्स कंपन्या, इ. मधील विविध प्रकारच्या कामांसाठी प्रशिक्षित करते. कंटेनर स्कूल उपक्रम देशातील अगदी दूरस्थ भागांमध्ये देखील उच्च दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यास आम्हाला मदत करतो. हे कंटेनर एक संपूर्ण प्रशिक्षण केंद्र बनवण्यासाठी ज्या-त्या ठिकाणच्या गरजेनुसार शाळेचा वर्ग, विश्रामगृह, कम्प्युटर लॅब, पुस्तकालय, डॉर्मिटरी, सिम्युलेशन (अनुकरण) लॅब, कार्यालय, इ. स्वरुपात रूपांतरित करता येऊ शकतात.”