सेलिब्रेशन की नदी प्रदूषण?

0

पिंपरी-चिंचवड । स्वातंत्र्य दिन साजरा करणे, हा भारतीय म्हणून आपला हक्क आहे, मात्र तो साजरा करताना आपल्याच देशातील आपल्याच हक्काच्या नैसर्गिक जलस्रोताला हानी पोहचवावी का, हा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी घटना काल मावळ तालुक्यात घडली. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी पर्यटक व काही पोलिसांनी त्यांच्या कल्पनेतून मावळातील भाजे लेणीजवळील धबधबा अक्षरशः तिरंगी केला. कल्पना छान आहे, तिचा हेतूही चांगला आहे, मात्र त्यातून आपण पिण्याच्या पाण्याचा एक नौसर्गिक स्रोत खराब करत आहोत, याचे भान पर्यटकांना व पोलिसांनाही राहिले नाही.

लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन भाजे लेणीजवळील धबधब्यात काल पर्यटक व पोलिसांच्या संकल्पनेतून हिरवा व नारंगी रंग टाकण्यात आला. याने धबधबा सुंदर दिसला व पर्यटकांचे, पोलीसांचे फोटो, व्हिडिओ व डीपीही उत्तम आले, युट्यूबवर, फेसबुकवर व्हिडिओ चांगला व्हायरल झाला, पण त्या रंग मिसळलेल्या पाण्याचे काय, त्याचा विचार कोणी केला नाही. प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात तशाच यालाही आहेत. काहींना गर्व वाटला, अभिमान वाटला तर पर्यावरणप्रेमींना हे चुकीचे वाटले, एखादी गोष्ट खराब करुन कसले आले सेलिब्रेशन, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

याविषयी भावसार व्हिजन या नदी प्रदुषणावर काम करणा-या संस्थेचे अध्यक्ष राजीव भावसार एमपीसी न्यूजशी बोलताना म्हणाले की, पाणी ही अशी गोष्ट आहे की त्यामध्ये एक थेंब जरी अशुद्ध टाकला तरी ते सारे पाणी अशुद्ध करते. त्यामुळे तुम्ही थोडा रंग टाकला किंवा जास्त टाकला काय सारखेच. तसेच झरा किंवा धबधबा पुढे नदीतच जातो ज्याचे पाणी तुम्ही शहरवासीय व स्थानिक गावकरी दोघे पिण्यासाठी वापरता. जलशुद्धीकरणात पाणी 100 टक्के शुद्ध होते असे नाही. रंग व त्यातील रसायने काही प्रमाणात तशीच राहतात. त्यात वापरलेला रंग पर्यावरणपूरक होता का, त्यात कोणती रसायने होती, याचाही पर्यटक व प्रशासन म्हणून सर्वांनीच विचार करायला हवा होता. एखाद्या नैसर्गिक जलस्रोताची जाणून-बुजूण नासाडी करणे कधीही अयोग्यच आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून जनजागृती होणे गरजेचे आहे,. त्या पाण्याच्या स्त्रोताला कोणताही धक्का न लावता ही मंडळी वेगळ्या माध्यमातून देशभक्तीचे दर्शन घडवू शकली असती, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. पर्यावरणतज्ज्ञ विकास पाटील म्हणाले की, तरुणवर्गात पर्यावरणाचे गांभीर्य नाही त्यात पोलिसांनीच त्यांना साथ द्यावी ही निंदनीय बाब आहे.

पर्यावरणाला जपा
तेथील स्थानिक गावक-यांनाही ही बाब काही रुचली नाही, पण बोलणार कोण? कारण दैनंदिन कामासाठी तेच पाणी त्यांना वापरावे लागते. तुमचा क्षणाचा खेळ त्यांच्या जीवाशी बेतू शकतो. त्यामुळे पर्यटनला जरुर जा, तेथे मनसोक्त आनंद लुटा, पण त्या पर्यावरणाला जपा, कारण… त्या पर्यावरणवर आपण अवलंबून असतो व आपली पुढची पिढीही!

नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरु शकतो
उटल त्यांनी केलेल्या या गैरकृत्याचे त्यांना गांभीर्य कळावे यासाठी उपस्थित पोलिसांसकट संबंधित पर्यटकांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करायला हवी. तुम्ही केवळ मजा म्हणून असा जलस्रोत खराब करु शकत नाही. तसेच आपल्या देशाचा ध्वज असा वाहून जाणारा आहे का, याचाही विचार करायला हवा होता. त्यांचा क्षणाचा आनंद नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरु शकतो, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले.