सेल्फिच्या नादात 2 विद्यार्थ्यांना पवनात जलसमाधी

0

लोणावळा : उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि त्यात रविवार असल्याने पवना धरण परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी होत असते. रविवारी सायंकाळी पवना धरणात दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यांचे मृतदेह सोमवारी सकाळी शिवदुर्ग रेस्क्यू टीमने शोधले. जितेश पगार (19 रा. नाशिक, जेएसपीएम कॉलेज, पुणे) व अनिकेत निकम (20 मूळ गाव रा. साक्री, धुळे, सिंहगड कॉलेज, लोणावळा) अशी पवना धरणात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पाण्यात सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मज्जाव करणारी कोणतीही यंत्रणा नाही
उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्याने धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक भटकंतीसाठी येतात. त्यात रविवार आणि सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. काही पर्यटक धरणाच्या जलाशयातही उतरतात. मात्र या ठिकाणी आलेल्या तरुणांना व पर्यटकांना यासाठी मज्जाव करणारी कोणतीही यंत्रणा येथे कार्यरत नाही. त्यामुळे अशा घटना घडत असतात. पवना धरण परिसरात ब्राम्हणोली गावच्या हद्दीत पवना धरण परिसरात फिरायला आलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थी पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. मिळालेल्या माहितीनुसार एकूण 6 मित्र पवना धरण परिसरात फिरायला आले होते.

सायंकाळीच राबवली शोध मोहीम
रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पवना धरणाच्या पाण्यात उतरून पोहत असताना जितेश पगार (19, रा. नाशिक, जेएसपीएम कॉलेज, पुणे) व अनिकेत निकम (20, मुळगांव साक्री, धुळे, सिहंगड कॉलेज, लोणावळा) हे बुडाले. विद्यार्थी बुडाल्याची माहिती समजताच स्थानिक नागरिकांसह लोणावळा ग्रामीणचे पोलिस व शिवदुर्ग या रेस्क्यू टीमने धरण परिसरात बुडालेल्या मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती. दरम्यान सोमवारी सकाळी साडेआठ वाजता पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आली. तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर दोघांचेही मृतदेह सापडले.

यांनी घेतले परिश्रम
शिवदूर्गच्या अजय शेलार, प्रवीण देशमुख, विकास मावकर, अमोल परचंड, राजू पाटील, नागेश इंगुळकर, दिनेश पवार, विशाल शेलार, सागर कुंभार, अजय राऊत, आनंद गावडे, महिपती मानकर, महेश मसने, प्रशांत इकारी, हनुमंत भोसले, हरिश्चंद्र गुंड, सुनील गायकवाड यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. पोलिस उपनिरीक्षक बालाजी गायकवाड, सुनील गवारी, कमलेश घुले, लक्ष्मण रणसौरे यांनीही परिश्रम घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप येडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.