पिंपरी-चिंचवड : सेल्फी कसा जीवघेणा ठरू शकतो, याची प्रचती पुन्हा गुरुवारी आली. मावळातील कुंडमळा येथे एक तरूण सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून इंद्रायणी नदीपात्रात पडला. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. स्थानिकांच्या मदतीने त्याला नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आले. सुशील कुमार बिल्ले (वय 24, रा. काळेवाडी) असे त्या तरुणाचे नाव आहे. सुशील गुरुवारी मित्रांसोबत कुंडमळा येथे वर्षाविहारासाठी गेला होता. तेथे रांजण खळगे बघत असताना वाहणार्या पाण्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. सेल्फी काढत असताना अचानक पाय घसरल्याने तो नदीपात्रात जाऊन पडला.
मित्रांनी केली आरडाओरड
फेसाळलेले पाणी व गतिमान प्रवाह याच्यामुळे तो क्षणार्धात दिसेनासा झाला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. ही आरडाओरड ऐकून स्थानिक रहिवासी व कुंडदेवी मित्र मंडळाचे कार्यकर्ते केतन भागवत, सचिन भेगडे, सुयश भेगडे, दत्ता भेगडे, अमोल भेगडे, किशोर भेगडे, आनंद ढोरे, योगेश शेलार हे मदतीसाठी सरसावले. त्यांनी मोठ्या धाडसाने स्वत:चा जीव धोक्यात घालून दोरीच्या सहाय्याने सुशीलला वाचवले.
आधीच्या घटनेतून बोध नाहीच
काही दिवसांपूर्वीच कुंडमळा येथे जळगाव जिल्ह्यातील ढोलीगाव येथील अतुल दशरथ पाटील (वय 25) या महाविद्यालयीन तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. अतुल पाटील हा स्टंटबाजी करताना पाण्यात पडला होता. त्यानंतर आता तीन ते चार दिवसांपूर्वी आंबोली घाटात दारुच्या नशेत कड्यावरून कोसळून दोन पर्यटक तरुणांचा मृत्यू झाल्याची घटनादेखील ताजी आहे. त्यामुळे या थरारक घटनांमधून अतिउत्साही लोकांकडून बोध घेतला जात नसल्याचे दिसून येत आहे. तरुणांनी किंवा इतर पर्यटकांनी जीव धोक्यात घालून सेल्फी काढणे किंवा दारुच्या नशेत कड्यावर जाणे टाळावे, असे आवाहन सुज्ञ नागरिकांकडून केले जात आहे.