धुळे : महिलांसह मुलींवर अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच कौटुंबिक हिंसाचाराला महिला बळी पडत असल्याच्या घटनाही समोर आहेत. धुळ्यातही अशीच धक्कादायक घटना समोर आली असून सेवानिवृत्त प्राचार्याने आपल्या सुनेवरच अत्याचार केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली.
व्हिडिओ काढून दिला पुरावा
शहरातील देवपुरातील तरुणीशी अभियंता मुलाचे लग्न लावून दिल्यानंतर निवृत्त प्राचार्य असलेल्या सासर्याने तिच्यावर अत्याचार केला तसेच छळ केला. पण या प्रकारावर कोणीही विश्वास ठेवत नसल्यामुळे पीडितेने अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून देवपूर पोलिसांना सोपवला. त्यानंतर सोमवारी सेवानिवृत्त प्राचार्य तथा पीडितेचा सासरा व इतर दोघांना पोलिसांनी अटक केली.
वारंवार अत्याचार केल्याचा आरोप
अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेतलेल्या 26 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनुसार तिचा विवाह अश्विन याच्याशी झाला. त्यानंतर पती अश्विन, सेवानिवृत्त शिक्षिका सासू शालिनी, निवृत्त प्राचार्य विकास यांनी तीचा छळ केला तसेच पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 40 लाखांची मागणी करण्यात आली तसेच सासरे विकास यांनी तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. याबाबत तीने पतीला सांगूनही त्याने विश्वास ठेवला नाही त्यामुळे पीडितेने अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मोबाइलचा कॅमेरा सुरू ठेवला. त्यानंतर अत्याचाराची घटना कॅमेर्यात कैद केली. याप्रकरणी अश्विन, शालिनी व प्राचार्य विकास याला देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.