जळगाव । अकोला येथील कृषी महाविद्यालयातून निवृत्त झालेले प्रा.गोपाळ एकनाथ जगताप (वय 75, रा.जीवनमोती सोसायटी, मोहाडी रोड, जळगाव) यांनी राहत्या घरात लुंगीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी साडे सहा वाजता उघडकीस आली. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबियांचे म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
जगताप व त्यांची नात दररोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जात असत. सोमवारी त्यांना का उशिर झाला म्हणून नात बघायला गेली असता जिन्यात लुंगीने गळफास घेतल्याचे दिसून आले. पोलिसांनी ही घटना कळविल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील व सहायक फौजदार निंबाळकर यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मुलगा दिनेश जगताप यांच्या माहितीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जगताप यांच्या पत्नीने वर्षभरापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे. तसेच सकाळी मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, जगताप हे गेल्या काही महिन्यापासून आजाराने त्रस्त झाले होते. त्याच आजाराला कंटाळून त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली असावी असा अंदाज कुटूंबियांनी वर्तविली आहे.