पुणे । आपले सैनिक सीमेवर खडा पहारा देत असल्यामुळे आपण सुखी जीवन जगत असतो, या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे ध्वजदिन निधी संकलन होय, अशा भावना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्यक्त केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन प्रसंगी ते बोलत होते. गतवर्षीच्या उद्दिष्टपूर्तीबद्दल सर्वांचे अभिनंदन करून यंदाही ध्वजदिन संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. अनंत सरदेशमुख, रमेश काळे, राजेंद्र मुठे, (नि.) मेजर मिलिंद तुंगार, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रियंका कुटे यांनी केले. डॉ. शशी कांबळे, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विलासराव सावंत, कृष्णा वाघमारे, दीपक मोरे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, त्यांचे कुटुंबीय, माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी, सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थी आदी उपस्थित होते.
2 कोटी 80 लाखांचे उद्दिष्ट साध्य
तुंगार म्हणाले, पुणे जिल्ह्याला गतवर्षी 2 कोटी 22 लाखांचे उद्दिष्ट होते, ते 2 कोटी 80 लाख इतके साध्य करण्यात आले. प्रारंभी ध्वजदिन निधीचे संकलनास सुरुवात करण्यात आली. दीपप्रज्ज्वलनानंतर शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार तुंगार यांनी केला. उत्कृष्ट कामगिरी करणार्या अधिकारी, कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. राजीव सांगळे, शैलेश गरड, तुषार शिंदे, तेजश्री काळे, शुभदा जगदाळे, सोनाली भोसले, प्रणय तिरखुंडे, शिवम बुनगे, सायली खांदवे, विवेक वागज, अंकित सारुक या विशेष कामगिरी करणार्या सैनिक, माजी सैनिकांच्या पाल्यांचाही गौरव करण्यात आला.
सत्कार्याला मदत करणे प्रत्येकाचे कर्तव्य
राव म्हणाले, माजी सैनिक, शहीद जवान अधिकारी यांचे कुटुंबीय यांच्या कल्याणाच्या योजना राबवण्यासाठी ध्वजदिन निधीचे संकलन केले जाते. देशाच्या रक्षणाची भूमिका बजावत असताना सैनिक सण, समारंभ, कार्यक्रम यांचा काहीही विचार न करता देशाच्या सेवेत कार्यरत असतात. अशा लष्करी अधिकारी-जवानांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. सैनिकांचे आपल्यावर ऋण आहे, या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही, त्यामुळे जबाबदारीच्या भावनेतून ध्वजनिधी संकलन करण्याच्या सत्कार्याला मदत करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राव यांनी सर्व सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.