पाचोरा– लष्करातील सुभेदाराने सैन्यात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने उत्तर महाराष्ट्रातील 300 जणांना सात कोटींचा गंडा घातल्यानंतर आरोपीसह त्याच्या पत्नी व मुलाला अटक करण्यात आली होती तर न्यायालयाने तिघाही आरोपींना 27 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, फसवणूक प्रकरणी व्याप्ती पाहता जिल्हा पोलीस अधीक्षका दत्तात्रय कराळे सोमवारी दिवसभर पाचोर्यात ठाण मांडून होते. या प्रकारात जो कुणी दोषी असेल त्यास आरोपी केल्याशिवाय राहणार नाही तसेच या प्रकाराच्या खोलवर चौकशीसाठी चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा कराळे यांनी येथे केली. अधिवेशनात या प्रकरणावर चर्चा झाल्यास तपास सीआयडीकडे सोपवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सुभेदारासह तिघांना अटक
नगरचा सुभेदार हुसनोद्दीन चांदभाई शेख (सुभेदार, इंजिनीअरिंग रेजिमेंट, तवांग) याच्यासह पत्नी रेश्मा व मुलगा वजीरने नोकरीच्या बहाण्याने सुमारे 300 वर तरुणांना सात कोटी रुपयांमध्ये गंडवले आहे. या प्रकरणी सचिन धनराज शिरसाठ (रा.भास्करनगर, पाचोरा) याने याप्रकरणी पाचोरा पोलिसात तक्रार दिल्यावरून वाळकी, ता. जि. नगर येथे जाऊन सुभेदार हुसनोद्दीन शेख, मुलगा वजीर व पत्नी रेशमा या तिघांना अटक करण्यात आली होती तर न्यायालयाने आरोपींना 27 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून मंगळवारी आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सुभेदार निघाला भगोडा ; अधिकार्याच्या आत्महत्येनंतर झाला कर्जबाजारी
लष्करात सुभेदार असणारा शेख यास सहा महिन्यापर्यंत लष्कारात न आल्याने भगोडा म्हणून जाहीर करण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी तो सहा महिन्यांच्या रजेवर होता तर त्यानंतरही तो नोकरीवर न परतल्याने त्याच्यावर सैन्याने कारवाई केल्याचे समजते. विशेष म्हणजे 2012-13 मध्ये शेख याने आपल्या एका अधिकार्यासह नोकरीसाठी काही कोटींची रक्कम दिली होती मात्र या प्रकाराची चौकशी लागल्यानंतर अधिकार्याने आत्महत्या केल्याने शेखचे पैसे बुडाल्याने तो कर्जबाजारी झाला म्हणून त्याने चाळीसगावच्या एकास एजंट बनवत अडीच कोटी घेतले या इसमाने पैशांचा तगादा सुरू केल्यानंतर पुन्हा बाहेरून व्याजाने पैसे घेतले तर सारखे व्याज वाढत असल्याने पुन्हा जामनेरच्या एका एजंटला गंडवले तसेच कळवणच्या ईसमाकडूनही दोन कोटी त्याने घेतल्याचे पोलीस चौकशीत सांगितल्याचे समजते. खान्देशातील तब्बल 300 वर तरुणांची फसवणूक केल्याची बाब समोर येत आहे.
एसआयटी करणार तपास
फसवणूक प्रकरणाचा तपास चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली होणर असून त्यांना समितीचे प्रमुख करण्यात आले आहे. शिवाय पोलीस उपअधीक्षक केशव पातोंडा, पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी तसेच जळगाव गुन्हे आर्थिक शाखेच्या अधिकार्यांदेखील मदत घेतली जाणार असल्याचे सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कराळे यांनी येथे सांगितले.