सैन्य भरतीत उंची वाढविल्याने जळगावकर उमेदवारांची नाराजी

0

सैन्य भरतीप्रक्रियेदरम्यान तरुणांचा आरोप ; 7210 उमेदवारांपैकी 328 मेडीकलसाठी पात्र

जळगाव- शहरातील क्रीडा संकुलातील मैदानावर नऊ जिल्ह्यासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. शनिवारी रात्री जिल्ह्यातील भडगाव, पारोळा व चाळीसगाव या तालुक्यांसाठी भरतीप्रक्रिया झाली. यात 7210 उमेदवारांपैकी केवळ 328 उमेदवार वैद्यकीय चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान रात्री भरतीच्याठिकाणी अचानकपणे उंची वाढविण्यात आल्याने अनेक उमेदवारांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. सैन्य दलाच्या सोल्जर जीडी, सोल्जर क्लर्क, सोल्जर टेक्निकल, ट्रेडस्मन, नर्सिंग असिस्टन्ट या पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु आहे. यादरम्यान प्रत्येक पदासाठी आधीच ठरवून देण्यात आली आहे. मात्र प्रक्रियेदरम्यान अधिकार्‍यांकडून अचानकपणे नियमापेक्षा अधिक उंची वाढविण्यात आल्याने अनेक उमेदवारांना घरचा रस्ता पकडावा लागला. 2010 नंतर म्हणजेच तब्बल 8 वर्षानंतर जळगावात भरती होत आहे. त्यातही नियमबाह्य उंची वाढविल्याने उमेदवारांना संधीला मुकावे लागले. तब्बल 1 हजारावर उमेदवारांना उंचीत बाद करण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडून मिळाली. आधीच धुळ्याच्या उमेदवारांनी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. जळगाव जिल्ह्याच्या उमेदवारही मंत्र्यांकडे तक्रार असून चौकशीची मागणी करणार आहेत.

जिल्ह्यातीलच उमेदवार वंचित
खासदार ए.टी.पाटील यांच्या प्रयत्नातून ही सैन्य भरती होत आहे. दरम्यान धुळ्याच्या उमेदवारांच्या तक्रारीनंतर खासदार ए.टी.पाटील यांच्याकडून साधी पाहणीही करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातीलच उमेदवारांना भरतीपासून वंचित रहावे लागत असेल तर भरतीचा उपयोग काय ? असा सवालही उपस्थित करत पारोळा, चाळीसगाव भडगावच्या उमेदवारांनी ‘जनशक्ती’ प्रतिनिधीजवळ संताप व्यक्त केला.