सोनगीरजवळ 89 तलवारींसह जालन्याचे चौघे पोलिसांच्या जाळ्यात
पाठलाग करून स्कॉर्पिओ पकडली : गुन्हेगारी वर्तुळात खळबळ
भुसावळ/धुळे : शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव निघालेल्या स्कॉर्पिओचा सोनगीर पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर वाहनातून तब्बल 89 तलवारी व एक खंजीर जप्त केला असून चौघांच्या मुसक्या बांधल्या आहेत. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. या तलवारींची नेमकी कुठून व कुठे वाहतूक केली जात होती व तलवारींचा वापर नेमका कशासाठी व कोणत्या उद्देशाने केला जाणार होता ? याची कसून चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
चौघा आरोपींसह घातक शस्त्र जप्त
शिरपूरजवळील वाघाडी फाट्याजवळ बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास स्कॉर्पिओ (क्रमांक एम.एच.09 सी.एम. 0015) भरधाव वेगाने जात असताना सोनगीर पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी वाहनाचा पाठलाग करून वाहन अडवले व वाहनाची कसून तपासणी केली असता त्यातून 89 तलवारी व खंजीर जप्त करण्यात आले. वाहनासह मुद्देमालाची किंमत सात लाख 13 हजार 600 रुपये आहे. या प्रकरणी संशयीत आरोपी मोहम्मद शरीफ मोहम्मद शफिक (35, सिद्धार्थ नगर, चंदन जिरा, वैशाली किराणाजवळ, जालना), शेख इलियास शेख लतिफ (32, सिद्धार्थ नगर, चंदन जिरा, वैशाली किराणाजवळ, जालना), सैय्यद नईम सैय्यद रहिम (29, सुंदर नगर, चंदन जिरा, एस.टी.वर्कशॉपमागे, जालना), कपिल विष्णू दाभाडे (चंदनजिरा, पंचशील नगर, बुद्धविहाराजवळ, जालना) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस उपअधीक्षक प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत पाटील, हवालदार श्यामराव अहिरे, ईश्वर सोनवणे, कॉन्स्टेबल सुरज साळवे आदींच्या पथकाने केली.