सोनगीरमधील तलवार प्रकरण : चौघा संशयीतांची पोलिस कोठडीत रवानगी
तपास धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग : चितोडगडला तपासासाठी जाणार पथक
धुळे : सोनगीर पोलिसांनी स्कॉर्पिओ तब्बल 89 तलवारी व एक खंजीर जप्त करीत जालन्यातील चौघांना अटक केली होती. संशयीतांना धुळे न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 2 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, सोनगीर पोलिसांकडील तपास आता धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
कारवाईने राज्यात खळबळ
शिरपूरजवळील वाघाडी फाट्याजवळ बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास स्कॉर्पिओ (क्रमांक एम.एच.09 सी.एम. 0015) मधून सोनगीर पोलिसांनी 89 तलवारी व खंजीर जप्त केला होता. या प्रकरणी संशयीत आरोपी मोहम्मद शरीफ मोहम्मद शफिक (35, सिद्धार्थ नगर, चंदन जिरा, वैशाली किराणाजवळ, जालना), शेख इलियास शेख लतिफ (32, सिद्धार्थ नगर, चंदन जिरा, वैशाली किराणाजवळ, जालना), सैय्यद नईम सैय्यद रहिम (29, सुंदर नगर, चंदन जिरा, एस.टी.वर्कशॉपमागे, जालना), कपिल विष्णू दाभाडे (चंदनजिरा, पंचशील नगर, बुद्धविहाराजवळ, जालना) यांना अटक करण्यात आली होती.
तपासासाठी पथक जाणार राजस्थानात
आरोपींनी राजस्थानच्या चितोडगड येथून या तलवारी खरेदी केल्याची कबुली दिली असून या तलवारींचे जादा किंमतीने जालन्यात विक्री करणार असल्याची कबुलीही दिल्याची माहिती आहे. धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आता राजस्थानातील चितोडगड येथे तलवार प्रकरणाच्या तपासार्थ जाणार असून मोठी शस्त्र तस्करांची टोळी जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिक तपास धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील व सहकारी करीत आहेत.