सोनगीर : सोनगीर पोलिसांच्या गस्ती पथकाने पाठलाग करीत स्कॉर्पिओतून होणारी गुटख्याची तस्करी रोखत दोन लाखांच्या गुटख्यासह धुळ्यातील संशयीतांला अटक केली आहे. शुक्रवार, 29 एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजता ही कारवाई करण्यात आली. अजीम अहमद मोहम्म्द शमीम अन्सारी (27, रा. जनता सोसायटी, हजरत अली मशीद, धुळे) असे अटकेतील चालकाचे नाव असून एक संशयीत पसार झाला आहे.
पाठलाग करून पकडला गुटखा
दोंडाईचा शहराकडून सोनगीरकडे भरधाव वेगाने येणारी स्कॉर्पिओ (एम.एच.18 ए. 6665) ला गस्ती पथकाने सोनगीर फाट्यावर अडवले असता चालकाने वाहन पळवले मात्र पथकाने पाठलाग करून सोनगीर टोल नाक्यापुढील सरवड फाट्याजवळ वाहन अडवले. यावेळी एक संशयीत पसार झाला तर चालक अजीम अहमद मोहम्म्द शमीम अन्सारी यास ताब्यात घेण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता त्यात राज्यात प्रतिबंधीत असलेला विमल पानमसाला गुटखा आढळला. दोन लाख 20 हजारांच्या गुटख्यासह सहा लाखांचे वाहन मिळून आठ लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, उपनिरीक्षक रवींद्र महाले, हवालदार अशोक पवार, सुरज सावळे, विजय पाटील आदींच्या पथकान केली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र महाले अधिक तपास करीत आहेत.